पालिकेच्या गाडीमुळे आजीची कंबर फ्रॅक्चर; दहिसर परिसरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:20 AM2023-03-28T10:20:53+5:302023-03-28T10:21:09+5:30
फुलगेना चौहान (६२) या दहिसरच्या शिवनेरी नगरमध्ये कुटुंबासोबत राहतात.
मुंबई : घराबाहेर फेरफटका करण्यासाठी गेलेल्या आजीबाईंना पालिकेच्या गाडीची व्हिजिट चांगलीच महागात पडली. यात फेरीवाल्यांच्या गाडीचा धक्का लागून त्यांच्या कमरेवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. या प्रकरणी त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलगेना चौहान (६२) या दहिसरच्या शिवनेरी नगरमध्ये कुटुंबासोबत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास त्या फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. त्याचवेळी एक पालिकेची गाडी त्या ठिकाणाहून गेली. ते पाहून या परिसरात आणि रस्त्यावर असणारे हातगाड्यांवरील भाजी विक्रेते भाजी घेऊन पळताना त्यांना दिसले. त्या स्वतः एका गल्लीच्या कॉर्नरवर उभ्या असल्याने त्यांच्या चाळीतील रहिवासी भाजीविक्रेता हा त्याची हातगाडी गल्लीमध्ये लपविण्यासाठी वेगाने येत असताना त्याचा धक्का चौहान यांना लागून त्या खाली पडल्या. त्यानंतर मोठ्या मुलाने त्यांना दहिसरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उजव्या पायाच्या कमरेजवळ फ्रॅक्चर झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरने सांगितले.