Join us

आजीबाईचा बटवा आणि कोरोनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी देशामध्ये लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. कोरोनाचा प्रसार देशातील गावागावामध्ये झपाट्याने वाढत ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी देशामध्ये लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. कोरोनाचा प्रसार देशातील गावागावामध्ये झपाट्याने वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी आता वेगवेगळे घरगुती आयुर्वेदिक म्हणजेच आजीबाईचा बटवा वापरला जात आहे. गावागावातील कुटुंबांमध्ये आणि शहरांमध्येदेखील सर्दी, पडसे, खोकला असे आजार झाल्यानंतर आजी तिला माहीत असलेली आयुर्वेदिक औषधी देत असे. आता या कोरोनाच्या काळातदेखील प्रामुख्याने ही औषधी दिली जात आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाचे रुग्ण : ६९६३७९

कोरोनामुक्त झालेले रुग्ण : ६५१२१६

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : २८५०८

कोरोना मृत्यू : १४५७४

सुषमा नागवेकर - सध्या कोरोनावर आयुर्वेदिक उपचार करण गरजेचे झाले आहे. सर्दी, पडसे अशा सामान्य लक्षणावर आपण घरच्या घरी उपचार करू शकतो. आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आहेत, त्यांचा वापर आपण आरोग्य टिकविण्याकरिता तेही अगदी स्वस्तात करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर आपण देवता म्हणू शकतो, इतके उपयोग या झाडांचे आहेत.

......................................................

प्रभावती जयराम राक्षे - कोरोनाचा प्रसार बहुतेक ठिकाणी वाढत आहे. यासाठी आपण आजीबाईचा बटवा म्हणजेच आयुर्वेदिक उपचारदेखील वापरू शकतो. खोकल्यासाठी हळद, तसेच बहुगुणी तुळसदेखील उपयोगी ठरते. अशी हजारो बहुगुणी झाडे आहेत त्या झाडांचा उपयोग सर्दी, पडसे, खोकला घालविण्यासाठी होतो. रात्री झोपताना तुम्ही हळद-दूध एकत्र पिऊ शकता. आल्याचा काढा तर यावर उत्तम उपाय आहे.

................................................

मुंबईत दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढले होते. सरकारने कडक निर्बंध लादल्यामुळे तो आकडा आता कमी आहे. सामान्यतः ८५ टक्के लोकांचा कोरोना हा घरी उपचारानंतरच बरा होत आहे. म्हणून नवनवीन आयुर्वेदिक उपचार सध्या पुढे येत आहेत.

कडुनिंबाचे महत्त्व तर आयुर्वेदिक उपचारांमध्येदेखील सांगितले आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहे. या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडुनिंब हे एक उत्तम जंतुनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही बऱ्याच आजारांवर उपायकारक ठरतो.

तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान, पण गुण महान’ असे आहे.

......................................................

तुळशीची पानं ही सर्दी, खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.

......................................................

कोरफड या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकड्याची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल.

अडुळसा या झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात.

....................................................

अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. खोकला झाल्यास २० मि.लि. काढा दिवसातून २ ते ३ वेळा या प्रमाणात ३ दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.

...........................................

हळद ही एका वनस्पतीच्या कंदाची पूड असते. आपल्या देशात ती जेवणात वापरतात आणि औषध म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. शेकडो वर्षांपासून तिचे औषधी गुण सर्वांना माहीत आहेत. हळदीची पूड रक्त थांबायला आणि जखम बरी करण्यात मदत करते.

.....................................................

त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहेडा या तीन फळांचं औषधी मिश्रण आहे. बद्धकोष्ठ, मधुमेह, तसेच वजन कमी करण्याकरिता याचे चूर्ण पोटात घेतात. बाहेरून लावल्यास जखमा भरून निघण्याकरिता हे उपयुक्त आहे. हे चूर्ण दात घासण्याकरिताही वापरतात.

ज्येष्ठमध ही एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे. हिच्या सुक्या काटक्या मिळतात. घसा बसल्यास याच्या खोडाची पूड मधात कालवून देतात. ही पूड वरवरचा घशातील खोकलाही बरा करते.

..............................................

शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेणाऱ्याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो. लहान मुलांच्या रोगांवर तर हे दिव्य औषध आहे.