Join us

युक्रेनच्या ग्रँडमास्टरला मुंबईकर रिषभने रोखले

By admin | Published: April 18, 2017 5:19 AM

शालेय बुद्धिबळपटू मुंबईकर रिषभ शाह याने चमकदार खेळी करताना युक्रेनचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर गोलोशापोव्ह याला बरोबरीत रोखले. एकाच वेळी

मुंबई : शालेय बुद्धिबळपटू मुंबईकर रिषभ शाह याने चमकदार खेळी करताना युक्रेनचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर गोलोशापोव्ह याला बरोबरीत रोखले. एकाच वेळी ४० प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रदर्शनीय सामना खेळताना रिषभने अलेक्झांडरला चांगलेच झुंजवले. दक्षिण मुंबई बुद्धिबळ अकादमीच्या (एसएमसीए) वतीने लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंड येथे झालेल्या या प्रदर्शनीय सामन्यात रिषभने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे, कसलेल्या अलेक्झांडरच्या प्रत्येक चालीवर प्रतिस्पर्धी खेळाडू विचारात पडत असताना दुसरीकडे रिषभने न डगमगता विचारपूर्वक चाली रचत आपली चमक दाखवली. कॅथड्रल अ‍ॅण्ड जॉन कॅनन स्कूलचा विद्यार्थी असलेल्या रिषभने कोणतेही अतिआक्रमण करताना भक्कम बचावाचे तंत्र वापरून अलेक्झांडरचे आक्रमण रोखून धरले. त्याने घोडा आणि उंटाच्या जोरावर अलेक्झांडरला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. तसेच, प्याद्यांचाही हुशारीने वापर करताना रिषभने अलेक्झांडरची चांगलीच कोंडी केली. दरम्यान, जगातील अव्वल १० बुद्धिबळ प्रशिक्षकांमध्ये गणना होत असलेल्या अलेक्झांडर मुंबईकर खेळाडूंची गुणवत्ता पाहूण प्रभावित झाला. त्याने म्हटले की, ‘माझ्याविरुद्ध आव्हान उभे केलेले सर्वच खेळाडू जबरदस्त गुणवान आहेत. त्यांनी या उपक्रमातून स्वत:ला सिद्ध केले.’ (क्रीडा प्रतिनिधी)