मुंबई : महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील सर्वसामान्य कुटुंबातील ४०० हून अधिक तरुणांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या त्रिकूटाला मालमत्ता कक्षाने शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. यात पालिकेच्या आजी - माजी कर्मचाऱ्यासह निवृत्त महिला अंमलदाराचा समावेश आहे. प्रकाश सदाफुले (६२), नितीन धोत्रे (३९) आणि प्रीती टाकर (६७) अशी अटक आरोपींची नावे आहेत.अँटॉपहिल परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय तक्रारदार महिलेला तिच्या मुलाला पाणी खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत, सदाफुले आणि धोत्रेने साडेतीन लाखांना गंडा घातला. या प्रकरणी तिने सायन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पाणी खात्यात नोकरीला असलेला सदाफुले २०१६ मध्ये निवृत्त झाला. धोत्रे हा पालिकेत सध्या कार्यरत आहे. महिला अंमलदार टाकर हिने स्वेच्छानिवृत्ती घेत या टोळीत सहभागी झाली.मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड, कोकण, विदर्भ असे राज्यभरातील तरुणांना या टोळीने गंडा घातला आहे. यात त्रिकुटाने बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे. या रॅकेटबाबत माहिती मिळताच, मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक केदारी पवार, तपास अधिकारी धीरज कोळी, लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने, अमित भोसले, सुभाष काळे आणि अंमलदार यांनी आरोपींच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे धोत्रे आणि सदाफुलेला राहत्या घरातूनच अटक केलीआहे, तर टाकरला एक लॉजमधून ताब्यात घेण्यात आले आहे. २०१४ पासून हे रॅकेट कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी ६८ कोटींपर्यंत गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. राजावाडी रुग्णालयातच मेडिकलधक्कादायक बाब म्हणजे, पालिकेच्या राजावाड़ी रुग्णालयात एका वेळी पाचशे ते हजार तरुणांची मेडिकल होत असे. त्यामुळे तरुणांचा यावर जास्त विश्वास बसत होता. यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय पथकाला आहे. पालिका चौकीतच व्हायच्या बैठकाधोत्रे आणि सदाफुले पालिका कर्मचारी असल्याने कामाच्या वेळेत येथील चौथी तर अनेकदा तरुणांसोबत बैठका पार पडायचा, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत आहे.
तुमचीही फसवणूक झाली आहे का?या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुण-तरुणींची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे तुमचीही अशी फसवणूक झाली असल्यास मालमत्ता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.