लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रजापिता बह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका दादी हृदयमोहिनी यांचे गुरुवारी मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १३ मार्चला सकाळी माऊंट अबू येथील ज्ञान सरोवर अकादमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
माऊंट अबू रोड येथील आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या शांतिवन येथे १२ मार्चला त्यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दादी हृदयमोहिनी यांच्या निधनाच्या वार्तेमुळे देशभरातील १४० सेवा केंद्रावर शोककळा पसरली आहे. राजस्थान सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावांमुळे कठोर नियम लागू केल्याने अंत्यदर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रवक्त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. एअर ॲम्बुलन्सने त्यांचे पार्थिव शक्ती भवन येथे नेण्यात आले. एक वर्षापूर्वी दादी जानकी यांच्या पश्चात दादी हृदयमोहिनी यांच्याकडे संस्थेचे मुख्य प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.