- राज चिंचणकरमुंबई : सध्याच्या धावपळीच्या युगात आत्मीयता जपणारी काही उदाहरणे समोर येतात की, ज्याने माणुसकीवरचा विश्वास दृढ होतो. असेच एक उदाहरण माहिममध्ये घडले. माहिम सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावरचे संकट टळले आहे.
वाचनालयापासून जवळच राहत असलेल्या वाचनालयाच्या एका ७४ वर्षीय वाचक सभासदाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. हे आजोबा एकटेच राहतात. गुरुवारी दुपारी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि त्यांना काळजीने ग्रासले. आपल्याला लगेच मदत मिळू शकेल, या उद्देशाने त्यांनी वाचनालयात फोन केला. त्या वेळी वाचनालयाच्या ग्रंथपाल रुक्मिणी देसाई यांच्या लक्षात एकंदर परिस्थितीचे गांभीर्य आले. त्यांच्या सूचनेनुसार वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल संदीप पेडणेकर यांनी आजोबांच्या घरी धाव घेतली.
त्यांच्यासोबत वाचनालयाच्या कर्मचारी सानिका पवार, नीलिमा कानडे व हर्षद चेऊलकर होत्या़ आपण संपर्क साधल्यावर वाचनालयाकडून नक्की मदत मिळेल, याची या आजोबांनाही पूर्ण खात्री असावी. म्हणूनच त्यांनी त्यांच्या घराचे दार उघडे ठेवले होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडचे एटीएम कार्डसुद्धा त्यांनी विश्वासाने टेबलवर काढून ठेवले होते.
वाचनालयाचे कर्मचारी आजोबांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना एकंदर स्थितीची कल्पना आली. त्यांनी आजोबांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात नेले. संदीप पेडणेकर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली काही रक्कमही तिथे देऊ केली. डॉक्टरांनी आजोबांना तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. वाचनालयाच्या कर्मचारी वर्गाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने या आजोबांच्या जीवावरचा धोका टळला आहे.