Join us

अनुदानित शाळेचा फलक न लावल्यास अनुदान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेकडून अनुदान घेणाऱ्या शाळा ‘मुंबई महापालिका अनुदानित शाळा’ असा फलक लावत नाहीत. ही गंभीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेकडून अनुदान घेणाऱ्या शाळा ‘मुंबई महापालिका अनुदानित शाळा’ असा फलक लावत नाहीत. ही गंभीर बाब सदस्यांनी निदर्शनास आणल्याने याची दखल शिक्षण समितीने घेतली आहे. शाळेच्या भिंतीवर अथवा दर्शनीय ठिकाणी फलक न लावल्यास अशा शाळांना यापुढे अनुदान देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी दिला आहे.

पालिकेकडून अनुदान घेणाऱ्या शाळा पालिकेकडून अनुदान मिळत असल्याबाबतचे फलक लावत नसल्याची तक्रार शिक्षण समितीमध्ये सदस्यांनी केला. त्यामुळे संबंधितांना अनुदानित शाळा असल्याचे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे. असा फलक न लावणाऱ्या शाळांचे अनुदान बंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी एखाद्या सामान्य विद्यार्थ्याच्या प्रवेशाबाबत पत्र दिल्यास काही कॉन्व्हेंट शाळा त्यास जुमानत नाही.

हा एक प्रकारे लोकप्रतिनिधी यांचा अवमान असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. पालिका इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या अनुदानित शाळांना अनुदान देत असते. त्यामुळे अनुदानित शाळांनी त्यांच्या शाळेच्या बाहेर दर्शनीय ठिकाणी फलक लावणे आवश्यक आहे. मात्र, अशा शाळांना पालिकेच्या अटी शर्ती मान्य नसतील, तर त्यांचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.