गणपतीपुळेसह इतर तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:31 AM2019-02-08T05:31:47+5:302019-02-08T05:32:22+5:30
कोकणातील गणपतीपुळे, संत गाडगेबाबांची कर्मभूमी आमला (जि. अमरावती) आणि हिंगोलीतील संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई - कोकणातील गणपतीपुळे, संत गाडगेबाबांची कर्मभूमी आमला (जि. अमरावती) आणि हिंगोलीतील संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या बैठकीस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह स्थानिक आमदार आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण ६ कोटी ७९ लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यात तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचण्यास रस्ता, वाहनतळ, स्वयंपाकघर, सभागृह, नदीकाठी संरक्षण भिंत, प्रवासी निवारा, परिसराचे सौंदर्यीकरण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी कामांचा समावेश आहे. तर नागरवाडी येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १८ कोटीच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. प्रस्तावात आवश्यक बदल करून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पुन्हा पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव संस्थानच्या विकासासाठी एकूण २५ कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये देण्यासही या वेळी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामध्ये
भक्त निवास, भक्तांसाठीच्या
सुविधा, घनकचरा व्यवस्थापन,
पाणीपुरवठा आदींचा समावेश
आहे. तर, कोकणातील
तीर्थक्षेत्र गणपतीपुळेच्या विकास आराखड्यातील कामांसाठी सुमारे १० कोटींचा निधी यंदा मिळणार आहे. यात रस्ते विकास, वाहनतळ, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, सुशोभीकरण, वाहनतळ व मंदिर परिसरात सौरऊर्जा आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.