Join us

मुंबईतील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार अभिमत विद्यापीठाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाला आणि पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाला आणि पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणार असून राज्य शासनाचा हा मानस असल्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. त्याचसोबत वैद्यकीय प्रवेशासाठी कमी जागा असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते, मात्र, आता यात काहीसा दिलासा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने नवे सात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशाच्या पदवी स्तरावरील १ हजार ९९० तर पदव्युत्तर स्तरावरील १ हजार आणि विशेषज्ञांच्या २०० जागा वाढणार आहेत.

अभिमत दर्जा प्राप्त होणार असल्याने या महाविद्यालयांना इतर अभिमत विद्यापीठाप्रमाणे शैक्षणिक सुविधा मिळतात. यासाेबतच काेर्सेस, अभ्यासक्रम, शुल्क तसेच प्रवेशप्रक्रिया निश्चित करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. महाराष्ट्रात सध्या २४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत, त्यामध्ये सुमारे सुमारे ४ हजार ३३० हजार वैद्यकीय प्रवेशाच्या जागा आहेत, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयात २ हजार २७० जागा आहेत. राज्य सरकारने सात जिल्ह्यांमध्ये नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवेश क्षमता वाढणार आहे.

सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी जमीन, पायाभूत सुविधा, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन व देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सध्याची वैद्यकीय महाविद्यालयांमधील क्षमता :

शासकीय महाविद्यालये - २४

प्रवेशक्षमता - ४३३०

खासगी महाविद्यालये - १८

प्रवेशक्षमता - २२७०

शासकीय दंत महाविद्यालये - ४

प्रवेशक्षमता - ३३६

खासगी दंत महाविद्यालये - २५

प्रवेशक्षमता - २३५०