संजय घावरे,मुंबई : नाट्य निर्मिती संस्थांना नवीन नाटकांच्या निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण सात मराठी नाटकांना २३,२५,००० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
नाटकांची निर्मिती करणाऱ्या संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी शासनाच्या वतीने अनुदान योजना मंजूर केल्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये 'अ' आणि 'ब' या वर्गवारीमध्ये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यात वेद प्रॉडक्शन हाऊस, एलएलपीच्या 'हिच तर फॅमिलीची गंमत आहे', जिगीषा अष्टविनायकच्या 'संज्या छाया', रॉयल थिएटरच्या '३८ कृष्ण व्हिला', बदाम राजा प्रॉडक्शनच्या 'खरं खरं सांग', प्रग्यास क्रिएशन्सच्या 'कुर्रर्रर्र', एकदंत क्रिएशन्सच्या 'मी, स्वरा आणि ते दोघे' या नाटकांचा समावेष आहे. 'अ' श्रेणीतील पाच नाटकांना १० प्रयोगांसाठी प्रत्येकी २,५०,००० रुपये, तर 'मी, स्वरा आणि ते दोघे' या नाटकाला १० आणि २५ अशा एकूण ३५ प्रयोगांसाठी ८,७५,००० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अर्चना थिएटर्सच्या 'प्रेम करावे पण जपून' या नाटकाला 'ब' श्रेणीअंतर्गत १० प्रयोगांसाठी २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.