मुंबई : महावितरणच्या कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना उपचाराच्या, तसेच विलगीकरणाच्या कालावधीची पगारी रजा मंजूर केली आहे, तसेच वेतनश्रेणी तीन व चारच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी विशेष बाब म्हणून एक वेळ एक हजार रुपये देण्यात येत आहे.
महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना काळात वैद्यकीय व आर्थिक सुरक्षा कवच देणारे परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एक वेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये अग्रीम मंजूर करण्यात आला आहे.
महावितरणच्या मुख्यालयासह सर्व परिमंडल कार्यालयांमध्ये चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून, या कक्षांद्वारे कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना व कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थानांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी रिकामे असलेली निवासस्थानांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त सोय म्हणून प्रशिक्षण केंद्रे, तसेच तेथील निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.