मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वामीराज प्रकाशन या संस्थेच्या वतीने मराठी आठव दिवस साजरा करण्यात आला. वाचन चळवळ वृध्दींगत व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने यावेळी यलो गेट आणि लोकमान्य टिळक मार्ग या पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट देण्यात आले.
स्वामीराज प्रकाशन संस्थेच्या वतीने दर महिन्याच्या २७ तारखेला मराठी आठव दिवस हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हा या उपक्रमाचा हेतू आहे. मे महिन्यातील हा दिवस " ती " ला समर्पित होता.भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम साजरा झाला.
यावेळी प्रमुख पाहुण्या सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांचा खास सत्कार करण्यात आला. यलो गेट पोलीस ठाण्याच्या प्रमुख सरला वसावे, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या प्रमुख ज्योती देसाई यांच्यासह मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे, पूजा राणे आदी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर शब्दाक्षर निर्मित कवी किरण येलें यांच्या ' बाईच्या कविता ' वर आधारित ' स्त्री, जातं, ओवी आणि कविता ' हा दीर्घांक सादर झाला. या कार्यक्रमाला महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता