Join us

मुंबईत ग्रंथोत्सवाची पर्वणी २२, २३ फेब्रुवारीला आयोजन

By स्नेहा मोरे | Published: January 31, 2024 7:53 PM

साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॉल उभारले जाणार आहेत.

मुंबई - राज्यात वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत  २२ व २३ फेब्रुवारीला ' मुंबई शहर ग्रंथोत्सव' आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन होणार आहे.

या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत मंगळवारी जिल्हा समन्वय समितीची बैठक दादर येथील मुंबई  मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यालयात झाली. या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, ग्रंथोत्सव समितीच्या अध्यक्ष मंजुषा साळवे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावंडे, कार्यवाह उमा नाबर, शिक्षण उपनिरीक्षक रविकिरण बि-हाडे, विजय सावंत, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबल, दिलीप कोरे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, मनपा शिक्षक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल साधना कुदळे, पी. पी गायकवाड, संजय गावकर, भगवान परब आदी उपस्थित होते.

या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडी, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान, लेखक आपल्या भेटीला असे दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. यावेळी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुला-मुलींमध्ये वाचन संस्कृती रूजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन लोकसहभाग वाढवावा. ग्रंथोत्सव हा 'लोकोत्सव' व्हावा, अशा सूचना बैठकीत मांडण्यात आल्या.