परिवहनमंत्री; आतापर्यंत २ लाख ६५ हजार चालकांनी भरले अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. यासाठी आतापर्यंत २ लाख ६५ हजार ४६५ परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज दिले आहेत, तर सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
दुसऱ्या लाॅकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांसाठी एकूण १०८ कोटी रुपयांच्या अनुदानाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे. यासाठी परिवहन विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. २२ मे २०२१ पासून रिक्षाचालकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. आजतागायत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा चालकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ४० चालकांच्या खात्यात अनुदान जमा केले आहे. त्याचप्रमाणे १ लाख ५ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याबाबत नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ला कळविण्यात आल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक असून, तो ज्या बँक खात्याशी जोडला आहे त्या खात्यात रक्कम ऑनलाईन जमा करण्यात येत आहे. तसेच, रिक्षा परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्याकरिता व मोबाईल क्रमांकाचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्याकरिता परिवहन कार्यालयांमध्येसुद्धा आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्जासह इतर माहितीसाठी १८००१२०८०४० या टोल फ्री नंबरवर सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहेत. रिक्षा परवानाधारकांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे आणि आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करावा, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले.
.................................