Join us

Corona Lockdown : 'मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन म्हणताच द्राक्षांचा दर 50 रुपयांवरुन 25 वर आला'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 2:35 PM

Corona Lockdown : मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्याचं सांगत आहेत, पण आमचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब मजूर, शेतकरी आणि कामगार वर्गाचं होतं.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी नुसतं लॉकडाऊन म्हटलं की, शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षांचा भाव कमी झाला. 50 रुपये किलो असणारे द्राक्षे 25 रुपयांवर आले, व्यापाऱ्यांना भाव पाडून मागायला सुरुवात केली

मुंबई - एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर राज्यातील विरोधी पक्षाने लॉकडाऊनला आपला विरोध असल्याचं म्हटलंय. 

मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्याचं सांगत आहेत, पण आमचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब मजूर, शेतकरी आणि कामगार वर्गाचं होतं. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले, गेल्या 15 दिवसांपासून मुख्यमंत्री लॉकडाऊन करावं लागेल, तर लॉकडाऊन करणार.. असल्याचं सांगत आहे. मुख्यमंत्र्यांनी नुसतं लॉकडाऊन म्हटलं की, शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षांचा भाव कमी झाला. 50 रुपये किलो असणारे द्राक्षे 25 रुपयांवर आले, व्यापाऱ्यांना भाव पाडून मागायला सुरुवात केली, असे गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सांगतिले. 

पंढरपूर भागातील काही द्राक्ष उत्पादक शेतकरी माझ्याकडं आली होती, त्यांनी मला ही हकीकत सांगितली. या पंढरपूर तालुक्यात 1 लाख टन द्राक्षे उत्पादीत झाले आहेत. पुढील दीड महिन्यात या द्रांक्षांची विक्री होणार आहे. पण, अशी लॉकडाऊनची परिस्थिती आली तर, या भागातला द्राक्ष बागायतदार मोडून पडणार आहे. गेल्या वर्षीचे पैसेही त्याला नीट फेडता आले नाहीत. पुन्ही तीच परिस्थिती निर्माण झाली, तर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी वास्तववादी परिस्थिती पडळकर यांनी कथन केली. 

कष्टकऱ्यांविरोधातील सरकार

उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन तोडणार नसल्याचं सांगितलं. पण, ऊर्जामंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी वीजबील भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडणार, असं सांगितलं. वीज तोडणीच्या निर्णयामुळेही द्राक्ष बागायतदारांसह इतरही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं पडळकर यांनी म्हटलं. महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांविरोधातला असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला.    

लॉकडाऊनला आमचा विरोधच

राज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़ मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली. मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, असा टोलाही पाटील यांनी लगावला. लॉकडाऊन लागल्यानंतर गोरगरीब आणि मजूरांचे हाल होतात. कामगार आणि धुणी-भांडी करणाऱ्या माझ्या माता-भगिनींच्या पोटा पाण्याचा प्रश्न उद्धवतो. दररोज हातगाडी लावून विकणाऱ्यांची उपासमार होते. लॉकडाऊन काळात आपण हे पाहिलं आहे,  जर 'केंद्र सरकारनं पॅकेज दिलं नसतं तर, कोरोनापेक्षा भूकबळीनंच जास्त लोकं मेली असती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 

टॅग्स :गोपीचंद पडळकरशिवसेनाकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेशेतकरीपंढरपूर