मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावरील कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, वांद्रे, मशीद, दादर, सांताक्रुझ, वडाळा, मुलुंड या रेल्वे स्थानकातील कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर, २०१९ या वर्षात १५० महिला प्रवाशांवर छेडछाडी, अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. यामध्ये १३६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी कायद्याने जेवढे काही करता येईल, तेवढे केले जाणार आहे, अशी माहिती सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
१३६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. २०१८ साली १५८ महिला प्रवाशांवर छेडछाडी करण्याचे प्रकार घडले, तर २०१७ साली ९७ प्रकरणांची नोंद करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे १४८, ९१ आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. २८ जानेवारी रोजी मुलुंड रेल्वे स्थानकावर सकाळी ९च्या सुमारास एक तरुणी उभी होती. यावेळी फलाटावरून लोकल आली असता, लोकलमधील एका विकृताने जोरदार फटका मारला. यामध्ये संबंधित तरुणीच्या नाकाला जोरदार मार लागला. त्यावेळी ही तरुणी बेशुद्ध झाली. इतर महिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. अजूनपर्यंत संबंधित तरुणी रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी त्या विकृताला अजून पकडले नाही. या मुलीला न्याय मिळवून देणार, अशी माहिती महेंद्र रावले यांनी दिली.
महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था वाढविली पाहिजे. महिला प्रवाशांचा प्रवास हा भयमुक्त करण्यासाठी विशेष पावले उचलणे अपेक्षित आहे.- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद.
रेल्वे स्थानकावरील गर्दुल्ल्यांना हटविले पाहिजे. २४ तास रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेच्या गस्ती असणे आवश्यक आहे. पादचारी पूल, कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी एक सुरक्षा कर्मचारी नेमण्यात यावा. गदुल्ल्यांना हटविण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले पाहिजे.
- वंदना सोनावणे, क्षेत्रीय रेल्वे प्रवासी समिती सदस्या.
गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. या घटना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी रेल्वे पोलिसांना जेवढे शक्य आहे, तेवढे केले जाणार आहे.- रवींद्र सेनगावकर, लोहमार्ग पोलीस आयुक्त.
महिला प्रवाशांची छेडछाड, अत्याचार करणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन विश्वास’ सुरू आहे. यासह सीसीटीव्हीच्या साहाय्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवले जाते. ज्या ठिकाणी गर्दी नाही, अशा भागात, पादचारी पूल येथे सुरक्षा व्यवस्थेचा फेरफटका सुरू केला आहे. स्थानकातून गर्दुल्ले बाहेर काढण्यात येत आहेत.- अश्रफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे.