लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात मंदावलेली हवाई वाहतूक क्षेत्राची गती हळूहळू वेग घेऊ लागली आहे. गेल्या महिनाभरात देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत ३४ टक्क्यांची वाढ झाली असून, ऑगस्ट महिन्यात तब्बल ६.७ दशलक्ष नागरिकांनी हवाई प्रवासाचा आनंद लुटला.
डीजीसीएच्या अहवालानुसार, जुलै महिन्यात देशांतर्गत मार्गावर ५.०१ दशलक्ष प्रवासी संख्या नोंदविण्यात आली होती. ऑगस्टमध्ये त्यात ३४ टक्क्यांची वाढ झाली. कोरोनाकाळातील ही सर्वाधिक वाढ आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल केल्यामुळे ही वाढ दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये इंडिगोने सर्वाधिक ३.८२ दशलक्ष प्रवासी हाताळले. त्यांची बाजारव्याप्ती ५७ टक्के इतकी होती. त्याखालोखाल एअर इंडिया ०.८९ दशलक्ष आणि स्पाईस जेटमधून ०.५८ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. त्यांची बाजारव्याप्ती अनुक्रमे १३.२ आणि ८.७ टक्के इतकी नोंदविण्यात आली.