मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून, सक्रिय रुग्णांचा आलेख उतरता असल्याचे दिसून आले आहे. या १४ जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण संख्या ५० च्या आत असून, सात जिल्ह्यांत केवळ एक अंकी सक्रिय रुग्णसंख्या आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, राज्यात सक्रिय रुग्णांचा आलेख कमी होत असून, आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत केवळ एक अंकी सक्रिय रुग्ण आहेत. या जिल्ह्यात रुग्णनिदानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही घट होत असल्याचे दिसून आले आहे. राज्यात आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण दिसून आले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णांची संख्या घटल्यामुळे रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींच्या निदानाचे प्रमाणही घटले आहे. परिणामी, सक्रिय रुग्णसंख्या कमी होताना दिसते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे, पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांच्या खाली असेल, तर कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. राज्यात मागील चार ते पाच आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी दर २.५ - २.६% टक्के असल्याचे दिसून आहे.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या कमी असलेले जिल्हे कोरोनामुक्तीच्या दिशेने आहेत. मात्र, भविष्यातील संसर्गही आटोक्यात ठेवण्यासाठी या जिल्ह्यांत ८० टक्के लसीकरण पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून या जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणेही तितकेच गरजेचे आहे.