Join us

राज्यात बाल कोरोना संसर्गाचा आलेख उतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात बाल कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, आतापर्यंत लहानग्यांना झालेल्या कोरोना संसर्गाचे प्रमाण ३ ते ४ ...

मुंबई : राज्यात बाल कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, आतापर्यंत लहानग्यांना झालेल्या कोरोना संसर्गाचे प्रमाण ३ ते ४ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत या संसर्गात ९५ टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात हे प्रमाण ६०,७५६ होते, तर सप्टेंबर महिन्यात ही संख्या २,६०८ इतकी आहे.

एकीकडे अमेरिकेत गेल्या आठवडाभरात अडीच लाख लहानग्यांना कोरोना झाला आहे. तसेच, सिंगापूर आणि जपानमध्येही हे प्रमाण वाढत आहे. या धर्तीवर राज्यातही लहानग्यांना होणाऱ्या संसर्गावर तज्ज्ञांची करडी नजर आहे. याविषयी, राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. विजय येवले यांनी सांगितले की, देशासह राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लहानग्यांच्या शरीरातही आता प्रतिपिंड निर्माण झाल्याने आपल्याकडे बाधित होण्याचे प्रमाण कमी आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या २ लाख १ हजार म्हणजेच ३.२ टक्के लहानग्यांना संसर्ग झाला, तर ११ ते २० वयोगटातील ४ लाख ९ हजार मुलांना कोरोना झाला आहे, हे प्रमाण ७.४ टक्के आहे. राज्याच्या बाल कोरोना टास्क फोर्सच्या डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले की, लहानग्यांना बाधित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्याचे प्रमाण घटले आहे. शिवाय, दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झाली तरी हे प्रमाण थांबलेले नाही. परंतु, गंभीर रुग्ण नाही. मात्र लहानग्यांचे नियमित लसीकरण विहित कालावाधीत पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी.