छत्रपती संभाजीनगर - शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपयांची उधळण केली. गळ्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल अडकवून आलेल्या या सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत आंदोलन केले. या सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर, या आंदोलनाची दखल घेत, येथील बीडीओवर कारवाई करण्यात आलीय.
राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. गिरीश महाजन यांनी केलेल्या कारवाईचं सरपंच मंगेश साबळे यांनी स्वागत केलंय. तसेच, मी उधळलेले पैसेही त्या महिला अधिकाऱ्यांकडून वसुल करुन, मला परत करावेत, अशी मागणीही आपण संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं साबळे यांनी म्हटलंय. कारण, मी उधळलेला पैसा हा शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा आहे, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले गिरीश महाजन
'मी 20 वर्षे झाले आमदार आहे, मी 20 वर्षे विरोधातही होतो. त्यावेळी आणि आताही मी राज्यभरात पाहतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत. पैसे मागितले जात आहेत. जास्त लोकांची मागणी आल्यावर तुझा नंबर आधी लावतो, याचा नंबर लावतो या गोष्टी होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलणार आहोत. जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आहे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे'
सरपंचाचे म्हणणे काय?
सरपंच मंगेश साबळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. म्हणून शुक्रवारी २ लाख रुपये घेऊन आलो; पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे या नोटा उधळल्या.
सरपंचाविरोधात गुन्हा दाखल
गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी सरपंच साबळे यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे सीईओ विकास मीणा यांनी लोकमतला सांगितले.