राम मंदिर साकारण्यात संतांचे मोठे योगदान, मंंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:57 AM2024-02-27T10:57:44+5:302024-02-27T10:59:06+5:30
विलेपार्ले येथे संत संमेलन संपन्न.
मुंबई : अयोध्येत राम मंदिर साकारण्यात आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात संतांचे मोठे योगदान आहे. संत गावोगावी फिरले, त्यांनी आजच्या तरुणपिढीला घरोघरी जाऊन संस्कार दिले. आध्यात्मिक शक्तीमुळे जग भारतापुढे नतमस्तक होत असून, देशाची विश्वगुरूकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. यासाठी संतांचे मार्गदर्शन मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.
विलेपार्ले पश्चिम येथील संन्यास आश्रमात आयोजित केलेल्या दोन दिवसीय संत संमेलनास त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. महासंस्कृती महोत्सव २०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित संत संमेलनाचे उद्घाटन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. या संमेलनाची संकल्पना त्यांची होती. त्यांनी उपस्थित संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
साधू-संतांना आवाहन :
देशात रामराज्य आणणे, हे फक्त संतांचे काम नसून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेणे गरजेचे आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळी देशातील सुमारे साडेचार हजार संत तिकडे उपस्थित होते. देशातील साडेपाच लाख गावांमध्ये दिवाळी साजरी केली. देशात साधारणपणे डिसेंबर महिन्यात होणारे धर्मांतर रोखण्यासाठी गावोगावी जाण्याची आवश्यकता असून, हिंदूंना संघटित करून हिंदुत्व वृद्धिंगत करण्याचे आवाहन अखिल भारतीय जनजागरण प्रमुख शरद ढोले यांनी केले.