मनोहर कुंभेजकर
मुंबई - नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला आज संध्याकाळी 6 वाजता आझादनगर 2 येथील गणेश मंडपातून सुमारे 15000 गणेश भक्तांच्या उपस्थितीत दिमाखात सुरवात झाली.फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आली होती.गणेश भाविकांनी आणि महिलांनी ट्रकवर जाऊन अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.तर अनेक गणेश भक्तांनी सेल्फी काढून अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपल्या मोबाईल मध्ये टिपली. अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक हळूहळू मार्गक्रमण करत आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड मार्गे राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, मछलीमार, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी उद्या शनिवारी दि,29 दुपारी पोहचेल.त्यानंतर वेसाव्याचे माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबीयांनी अंधेरीच्या राजाची यथासांग पूजा केल्यावर उद्या दुपारी 2 च्या सुमारास 18 तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली जमात गणेश विसर्जन मंडळाचे अध्यक्ष पंकज जोनचा व सचिव विरेंद्र मासळी आणि त्यांचे कार्यकर्ते वेसाव्याच्या खोल समुद्रात खास सजवलेल्या बोटीतून भावपूर्ण निरोप देतील अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे यांनी दिली.
१९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीलाच विसर्जन होते. सायंकाळी अंधेरीच्या राजाची संपूर्ण रात्रभर भव्य मिरवणूक निघते.या मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महिला ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळले.तर अनेक गणेश भक्तांनी आज अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडला.मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाणपोईची खास व्यवस्था देखिल अनेक संस्था व दानशूर यांनी केली होती माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी दिली. दरम्यान, अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधवांनी देखिल अंधेरीच्या राजाचे जोरदार स्वागत केले आणि दिवाळीत आपला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले अशी माहिती समितीचे सचिव विजय सावंत आणि उदय सालियन यांनी शेवटी दिली.