महानगरात रक्तदात्यांचा आलेख घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:02 AM2018-06-14T05:02:45+5:302018-06-14T05:02:45+5:30
एकीकडे वाढते अपघात आणि गंभीर आजारावर उपचारासाठी मुंबईत रक्ताची मागणी वाढत असताना, दुर्दैवाने रक्तदात्यांचा तुटवडा जाणवत आहे.
- कुलदीप घायवट
मुंबई : एकीकडे वाढते अपघात आणि गंभीर आजारावर उपचारासाठी मुंबईत रक्ताची मागणी वाढत असताना, दुर्दैवाने रक्तदात्यांचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत संकलित होणाऱ्या रक्तपिशव्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. रक्तदान शिबिरांची संख्या वाढत असताना, रक्तदान करण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र समोर आल्यामुळे तरुणाईने जागृत होऊन रक्तदान करण्याचे आवाहन रक्तदान शिबिरांच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.
२०१७च्या अहवालानुसार मुंबईत तीन हजार १२१ रक्तदान शिबिरांतून दोन लाख ९५ हजार ७९५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. मात्र, मागील तीन वर्षांच्या अहवालानुसार रक्त संकलनाचे प्रमाण घसरलेले असल्याचे दिसून येते. २०१६ साली दोन हजार ८९५ रक्त शिबिरांतून तीन लाख चार हजार २२५ रक्तपिशव्या, २०१५ साली दोन हजार ९४० रक्तदान शिबिरांतून तीन
लाख सात हजार ८०७ रक्तपिशव्या, २०१४ साली तीन हजार ५९५ हजार रक्तदान शिबिरांतून तीन लाख
११ हजार ५५७ रक्तपिशव्यांचे
संकलन करण्यात आले होते. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरांत आयोजित करण्यात येणारी शिबिरे व त्या माध्यमातून जमा होणाºया रक्तपिशव्यांच्या माहितीचा आढावा ‘लोकमत’तर्फे घेण्यात आला. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अहवालातून या बाबतची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात एकूण ३३२ रक्तपेढ्या असून, या रक्तपेढ्यांमध्ये एकूण १६ लाख दोन हजार ६९० रक्तपिशव्या आहेत. मुंबईत ६० रक्तपेढ्या आहेत. राज्यामध्ये सर्वांत जास्त रक्तपेढ्या मुंबईत आहेत. मुंबईपाठोपाठ पुण्यात ३३, ठाण्यात २३, सोलापूर व सांगलीमध्ये १७, नाशिक १६, नागपूरमध्ये १४, औरंगाबादमध्ये ९ रक्तपेढ्या आहेत. राज्यात एकूण २७ हजार १९३ रक्तदान शिबिरांतून १६ लाख दोन हजार ६९० रक्तपिशव्या जमा करण्यात आल्या आहेत.
यंदा ‘ब्लड कनेक्ट अस आॅल’
जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने यंदा ‘ब्लड कनेक्ट अस आॅल’ अशी संकल्पना मांडण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘कोणीतरी पुढे येऊन रक्त द्या आणि जीवन वाचवा’ हे घोषवाक्य वापरले जात आहे. रक्त न मिळाल्यामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये, यासाठी १४ वर्षांपासून जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.
पॅलिसीमिया या आजाराच्या रुग्णांना रक्ताची सातत्याने व सर्वाधिक आवश्यकता असते. या रुग्णांना दर १५ दिवसांतून रक्त पुरवावे लागते. या रुग्णांच्या शरीरात रक्त तयार होत नाही, त्यामुळे अशा रुग्णांना सातत्याने रक्त पुरविणे अत्यावश्यक ठरते. पॅलिसीमियाग्रस्त रुग्णाला दरवर्षी २१ रक्तदात्यांची गरज भासते.
एप्रिल ते जुलै या महिन्यांत रक्तदात्यांची संख्या तुलनेने कमी होते. या महिन्यात कॉलेज, शाळा बंद असल्यामुळे नागरिक बहुसंख्येने बाहेरगावी जातात. एप्रिल आणि मे महिन्यांत जास्त उष्णतेमुळे रक्तदात्यांचे प्रमाण कमी होते.
दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. अपघात, महिलांना गरोदरपणाच्या वेळी, विविध आजारपणामध्ये रुग्णांना रक्ताची गरज भासते. काही वेळेला नैसर्गिक आपत्तीमुळे, कोणाला गंभीर इजा झाल्यास रक्त लागते. रक्तपेढीत रक्त उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रक्तदान करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार एखाद्या ठिकाणच्या एकूण लोकसंख्येपैकी एक टक्क ा रक्त आवश्यक असते. राज्यात सुमारे १२.५० कोटी लोकसंख्या आहे, त्यामुळे या लोकसंख्येच्या एक टक्का रक्त म्हणजे साडेबारा लाख युनिट्स रक्त आवश्यक आहे.
- डॉ. अरुण थोरात, सहायक संचालक, राज्य रक्तसंक्रमण परिषद