Join us

रोहित पाटलांचा मोठा सन्मान, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 7:17 AM

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मुंबई - भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी, नुकतेच कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवा चेहऱ्याला ध्वजारोहनाचा बहुमान देण्यात आला. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रोहित पाटील यांनी या सन्मानाबद्दल ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहेत. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी राज्य घटना मिळाली त्या राज्यघटनेतील तरतुदीचे पालन करणे त्यासाठी आग्रही राहणे आणि वेळप्रसंगी लढाई करणे यातून आपले हे प्रजासत्ताक राज्य बलवान बनवणे हा आपल्यासमोर कार्यक्रम असायला हवा असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. खासदार सुप्रियाताई सुळे व युवा नेते रोहित पाटील यांनीही मार्गदर्शन केले.  रोहित पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत मोठं यश मिळवल्याने सध्या राष्ट्रवादी त्यांच्याकडे भविष्यातील राज्याचा युवक नेता म्हणून पाहत आहे. आपल्या बोलण्या-वागण्यातून दिवंगत नेते आणि त्यांचे वडिल आर.आर. पाटील यांची आठवण रोहित हे महाराष्ट्राला करुन देत आहेत. त्यामुळे, निवडणुकीतील विजयानंतर अनेकांना त्यांच्यात आर.आर. आबांचे प्रतिबिंब दिसून आले. आता, राष्ट्रवादीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात बड्या नेत्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनाचा मान रोहित यांना दिल्याने राष्ट्रवादी त्यांच्याकडे जबाबदार नेते म्हणून पाहात असल्याचे दिसून येते.   

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष

दरम्यान, निवडणूक निकालानंतर सांगलीत स्थानिक कार्यक्रमानिमित्त पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनीही महत्वाचे विधान केले होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत एक ट्वीट केले होते. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या पक्षात नेहमी होते. त्यामुळे काही अडचण नाही. शेवटी पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केलं पाहिजे, हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याला जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमुंबईसुप्रिया सुळेरोहित पाटिल