आयटीआय प्रवेशासाठी ‘महा आयटीआय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:07 AM2018-06-21T06:07:41+5:302018-06-21T06:07:41+5:30
राज्यभरात सध्या आयटीआयच्या १,३६,१९३ जागांसाठी प्रवेश नोंदणी सुरू आहे.
मुंबई : राज्यभरात सध्या आयटीआयच्या १,३६,१९३ जागांसाठी प्रवेश नोंदणी सुरू आहे. राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे प्रवेश केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ‘महा आयटीआय’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासंबंधीची सगळी माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर मिळेल.
आयटीआयसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काहीही माहिती हवी असल्यास किंवा त्यांच्या प्रवेशाची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे अॅप्लिकेशन उपयुक्त असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाचे संचालक योगेश पाटील यांनी सांगितले. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जाची सध्यस्थिती, आॅप्शन फॉर्म सबमिट करणे, अलॉटमेंट लेटर मिळविणे, प्रवेश कन्फर्म करणे, अशा प्रक्रिया सुलभतेने करता येतील. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संचलनालयाकडून हे अॅप्लिकेशन आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
* पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
राज्यभरात आयटीआयच्या खासगी आणि शासकीय दोन्ही मिळून १ लाख ३६ हजार १९३ जागा उपलब्ध आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २ लाख ७८ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख १३ हजार ३६९ विद्यार्थ्यांच्या अर्जाची निश्चिती झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ३० जून आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे.