मुंबई - मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघात जाऊन मनसेच्या पक्ष कार्यालयात तरुण तरुणींशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (MNS Amit Thackeray) यांनी मनविसेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबईतील १० विभागांतील मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या, आज त्यांनी तब्बल २१ विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आणि संबंधितांना नेमणूक पत्रे दिली. नेमणुका करताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या विद्यार्थी संघटनेत तरुणींना तसंच विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचे दिसत आहे.
अमित ठाकरे यांचे मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान गेले दोन आठवडे मुंबईत सुरू होते. वडील रुग्णालयात असताना आणि राज्यात राजकीय भूकंप होऊनही त्यांनी न थांबता मुंबईतील ३६ विभागांना भेटी देऊन सुमारे ७,००० विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. मुंबईतल्या प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट स्थापन करण्याचा निर्धार अमित यांनी या तरुणांपुढे बोलताना व्यक्त केला होता. अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुण तरुणींनी मनविसेत काम करण्याची इच्छा त्यांच्यापुढे बोलून दाखवली होती.
आज अमित ठाकरे यांनी केलेल्या नेमणुकामध्ये डॉ. जान्हवी तूर्डे यांची मनविसेच्या सचिवपदी, तर श्रुती नाईक (वांद्रे पूर्व), प्रियल मालणकर (विलेपार्ले), ॲड्व. स्नेहल आडारकर (कलिना), प्रियांका निंबाळकर (चांदिवली), प्रियांका थोरात (दहिसर), शाहीन कुपवडेकर (मागाठणे), दीपाली करंबळे (कांदिवली पूर्व), नीलांबरी सावंत (चारकोप), प्रियांका श्रीगडी (मुंबादेवी), सायली जाधव (जोगेश्वरी), वेरोमिका डिसुझा (वर्सोवा), जान्हवी पारकर (दिंडोशी), प्रियंका कासले (सायन) यांची मनविसे विद्यार्थिनी विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
"विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यातल्या तरुणींनाच पुढे यावं लागेल, तरुणींना अधिकाधिक प्रतिनिधित्व देऊन त्यांचे संघटनेतील स्थान अधिक बळकट करावे लागेल" असं मत अमित ठाकरे यांनी प्रत्येक बैठकीत मांडलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक तरुणींनी त्यांच्यासोबत मनविसेत जबाबदारी स्वीकारून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.