मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:39 PM2022-05-17T16:39:36+5:302022-05-17T16:40:44+5:30
आता शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबई - बीड तालुक्यातील हिंगणगाव येथील एक शेतकरी ऊस गाळपास जात नसल्याने नैराश्यात होते. त्यामुळे शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. त्यामुळे, शेतकरी संघटनांचे नेते आणि ऊस उत्पादक शेतकरीही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलू नये, असेही सरकारतर्फे सांगण्यात आलं. त्यानंतर, आता शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव (32) या युवक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचल्याने शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, राज्यातील अनेक भागातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटनांचे नेतेही राज्य सरकारविरोधी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता, संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठकीत दिले.
#ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री#उद्धवठाकरे यांनी अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठकीत दिले. १ मेनंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू. प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. pic.twitter.com/UnWyUuoVMS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 17, 2022
शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता, शेतातील ऊस नक्कीच कारखान्यात जाईल आणि आपलं नुकसान टळेल हीच आशा सर्व शेतकऱ्यांना आहे.