अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पश्चिम रेल्वेवर वाढणार लोकलच्या १५० फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:33 AM2020-09-19T07:33:48+5:302020-09-19T07:38:57+5:30
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यात लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून या लोकल फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावानंतर मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा बंद करण्यात आली होती. जून महिन्याच्या मध्यावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली. या लोकलमधील फेऱ्यांचे प्रमाण हे मर्यादित होते. आता या लोकल फेऱ्यांना वाढत असलेली गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार २१ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० अधिक फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून या लोकल फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ३५० लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. मात्र गर्दीचे वाढते प्रमाण विचारात घेऊन पश्चिम रेल्वेने अजून १५० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता २१ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवर उपनगरीय लोकल सेवेच्या एकूण ५०० फेऱ्या चालवण्यात येतील. या निर्णयामुळे उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
The number of daily spl suburban services will be increased from 350 to 500 on WR from 21/9/2020 to maintain social distancing & avoid crowding.
— Western Railway (@WesternRly) September 18, 2020
Essential staff as notified by State Govt to travel in local trains is requested to follow social distancing & wear mask during travel pic.twitter.com/iGhzOD41Ib
किती काळ लोकल सेवेवर मर्यादा आणणार?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
कोरोनामुळे आणखी किती काळ लोकल सेवांवर मर्यादा आणणार, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या आठवड्यात विचारला होता. कोरोनाबरोबर राहायला शिकले पाहिजे. परंतु, सामाजिक अंतराचे भान राखूनच, असेही न्यायालयाने म्हटले.
अन्य अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांबरोबर वकिलांनाही लोकल प्रवासास परवानगी द्यावी, अशी मागणी करणा-या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. अद्याप लोकल सेवा सुरू करण्याचा विचार नाही, अशी माहिती राज्य सरकारने देताच न्या. दत्ता यांनी हे आणखी किती काळ चालणार, असा सवाल केला होता.
बसच्या गर्दीत कोरोना होत नाही का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल
बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा सवाल राजू पाटील यांनी ट्विट करत केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजू पाटील यांनी ट्विट करत हा सवाल विचारला असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर लोकलसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. बदलापूर,अंबरनाथ, कल्याण,डोंबिवली आणि दिवा येथील नागरिक बससाठी तासनतास रांगा लावत आहेत, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी यामध्ये सर्वसामान्य प्रवासी भरडला जात असून 5 ते 6 हजार भाड्याचा खर्च होतो ते कसे परवडेल असेही पाटील म्हणाले. सरकारने दिलासा द्यावा, असं राजू पाटील यांनी म्हटलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी