मुंबई – मुंबईत कोरोनाच्या संसर्गातून हळुहळू सावरत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. शहर उपनगरात रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्के झाले आहे. मुंबईत १ हजार ३४७ रुग्ण तर ६२ मृत्यू झाले आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ८५६ असून मृत्यू ५ हजार ६४ झाले आहेत. आतापर्यंत ५९ हजार २३८ कोविडमुक्त झाले आहेत.
सध्या २३ हजार ५४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बुधवारी नोंद झालेल्या ६२ मृत्यूंमध्ये ५९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४९ रुग्ण पुरुष व १३ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी पाच जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४१ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. तर उर्वरित १६ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत. १ ते ७ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.५४ टक्के आहे. तर मंगळवारपर्यंत शहर उपनगरात कोविडच्या एकूण ३ लाख ६८ हजार ६०३ चाचण्या झाल्या आहेत
कोविड चाचणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे
- कोविड संशयित व लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पालिकेने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय चाचणी कऱण्याची परवानगी दिली आहे.
- कोविड संशयित रुग्णांना गरज असले तर खासगी प्रयोग शाळेमार्फत घरी चाचणी करु शकतात.
- कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेले लक्षणविरहित अतिजोखमीचे व्यक्ती ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, अशा व्यक्ती स्वयंघोषित प्रमाणपत्र शिवाय कोविड रुग्णांच्या संपर्कापासून ५ दिवस व १० दिवसांमध्ये चाचणी करु शकतात.
- कोविड संशयित व लक्षणे असलेल्या तसेच, अतिजोखमीचे व्यक्तीं ज्यांना रुग्णालयाची गरज आहे अशा व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाऊ शकते. त्याकरिता, रुग्णालय नॅशनल एक्रिडेशन बोर्ड फाॅर हाॅस्पिटल अँड हेल्थकेअर मान्यता प्राप्त असावे. ही चाचणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मार्गदर्शक सुचनेनुसार मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळेमधून करावी
अन्य महत्वाच्या बातम्या...
राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार
शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय
ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी
पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले