नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; तोंडी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:06 AM2020-07-23T01:06:45+5:302020-07-23T06:45:55+5:30

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करावे, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.

Great relief to the ninth, eleventh failed students! | नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; तोंडी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची मिळणार संधी

नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; तोंडी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची मिळणार संधी

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शक्य नाही. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून आणखी एक संधी शिक्षण विभागाने दिली आहे. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ७ आॅगस्ट, २०२० पर्यंत प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे घेण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानंतर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावी व बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या.

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करावे, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अकरावी व नववीचे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले. त्यातच २०१८ या शैक्षणिक वर्षाप्रमाणे होणारी फेरपरीक्षा ही यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक पालकांसह शिक्षक संघटनांनी याचा निषेध करत विद्यार्थ्यांना सरसकट पास करून दहावी व बारावीच्या वर्गात पाठविण्याची विनंती वारंवार केली.

काही पालकांनी नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत निर्णय घ्यावा, यासाठी आॅनलाइन आंदोलनही केले. पदवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सोबतच विद्यार्थी सुरक्षाही महत्त्वाची आहे. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे, त्यांना वेगळा न्याय का? असे प्रश्न राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित करत आंदोलनाचा पाठपुरावा केला होता.

शिक्षक संघटनांसह पालकांनी ही मागणी सातत्याने लावून धरल्यामुळे, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून शिक्षण विभागाकडून ७ आॅगस्टपर्यंत शाळांना विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया दराडे यांनी दिली.
निर्णयाचे स्वागत

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षेच्या निर्णयाचे स्वागतच आहे. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळून, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
- प्रशांत रेडिज, मुंबई सचिव, मुख्याध्यापक संघटना

Web Title: Great relief to the ninth, eleventh failed students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.