‘थिएटर आॅलिम्पिक्स’ची शानदार सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:51 AM2018-04-09T05:51:02+5:302018-04-09T05:51:02+5:30
नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एन.एस.डी.) अर्थात, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे १७ फेब्रुवारीपासून देशभरात सुरू असलेल्या ८व्या ‘थिएटर आॅलिम्पिक्स’ची शानदार सांगता मुंबईत झाली.
मुंबई : नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एन.एस.डी.) अर्थात, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे १७ फेब्रुवारीपासून देशभरात सुरू असलेल्या ८व्या ‘थिएटर आॅलिम्पिक्स’ची शानदार सांगता मुंबईत झाली. सुमारे २५ हजार कलावंत आणि ४५० प्रयोगांनी गेले ५१ दिवस रंगलेल्या या महोत्सवाचे मुंबईच्या कामगार क्रीडा भवनात सूप वाजले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, या महोत्सवाचे कला दिग्दर्शक रतन थिय्याम, एनएसडीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. अर्जुन देव चरण, आंतरराष्ट्रीय थिएटर आॅलिम्पिक्सचे अध्यक्ष थिओडोरोस टेरझोपावलोस, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नवाझुद्दीन सिद्दिकी, एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता सोहळा पार पडला.
मुंबईला सिनेमाची जननी असे म्हटले जाते, पण महाराष्ट्राला रंगभूमीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नाटक संक्रमित होत गेले आहे. विविध परिस्थितीत रंगभूमीने आपले स्थान अबाधित राखले आहे. समाजाच्या संवेदनांचे प्रतिबिंब रंगभूमीवर पडलेले दिसते. नाटक आणि रंगभूमी कधीही मरण पावणार नाही, असे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी काढले.
जीवन हे नाटकासारखे असते. जीवनाप्रमाणेच नाटक सुरू असते. मुंबईचेही तसेच आहे, मुंबई कधी थांबत नाही. देशाच्या एकतेसाठी हा देश सांस्कृतिकतेच्या धाग्यात विणला गेला पाहिजे. थिएटर आॅलिम्पिक्सच्या माध्यमातून हे उद्दिष्ट सफल होण्यास प्रारंभ झाला आहे, असे भाष्य डॉ. महेश शर्मा यांनी केले, तसेच प्रा. वामन केंद्र यांनी रंगभूमीला एक वेगळे व्यासपीठ मिळवून दिले आहे. हे कार्य महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही रंगभूमी जिवंत ठेवत आहात, याबद्दल तुमचे आभार, असे मनोगत नाना पाटेकर यांनी या वेळी व्यक्त केले. ताकद आणि क्षमता दाखविण्याच्या अनेक संधी मिळत असतात, परंतु ८व्या थिएटर आॅलिम्पिक्सने आम्हाला आपल्या संस्कृतीची शक्ती दाखवून देण्याची अपूर्व संधी मिळवून दिली, असे उद्गार प्रा. वामन केंद्रे यांनी काढले. दरम्यान, ‘रंग शिखर’ या आदिवासी लोककलेचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. नवाजुद्दीन सिद्दिकी, मनोज जोशी, हिमानी शिवपुरी, सचिन खेडेकर यांनी नाट्यप्रवेशांचे सादरीकरण केले. ज्येष्ठ शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, भरतनाट्यम नृत्यांगना संध्या पुरेचा, लावणी कलावंत वैशाली जाधव यांनीही या वेळी कार्यक्रम सादर केला.