Join us

महार रेजिमेंटच्या शौर्याची थोर परंपरा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 3:42 AM

महार रेजिमेंटला शौर्याची थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत देश रक्षणासाठी महार रेजिमेंटने अतुलनीय शौर्य दाखविले आहे.

मुंबई : महार रेजिमेंटला शौर्याची थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत देश रक्षणासाठी महार रेजिमेंटने अतुलनीय शौर्य दाखविले आहे. शौर्याची ही प्रेरणादायी परंपरा नव्या पिढीसमोर यावी, या हेतूने राज्य सरकारने महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव व शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. तसेच राज्यात महार रेजिमेंटचे गौरव स्मृती संग्रहालय उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

गेट वे आॅफ इंडिया येथे राज्य सरकारकडून आयोजित महार रेजिमेंट अमृत महोत्सवानिमित्त शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांच्या गौरव समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले, माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, राहुल नार्वेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ५१ शौर्य प्राप्त सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची जबाबदारी महार समाजातील शूरवीरांकडे दिली होती. संभाजी महाराजांच्या संरक्षणासाठी महार योद्धे धावून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांना महार योद्ध्यांची शौर्यगाथा दाखवून महार रेजिमेंटची स्थापना करण्यास भाग पाडले. तर, सर्जिकल स्ट्राइकमध्ये महार रेजिमेंटचा सहभाग होता. केंद्र शासनामार्फत माजी सैनिकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे भामरे यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे शौर्य गाजविणाऱ्या सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्याचा सन्मान मिळाल्याचे रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस