Join us

बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:06 AM

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणे गरजेचे आहे. तशी मागणी आपण शहर विकास विभागाकडे केली असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.

मुंबई भाजपचे प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी ‘महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणे गरजेचे आहे,’ या मंत्री अस्लम शेख यांच्या मागणीवर जोरदार टीका केली होती. ‘लोकमत ऑनलाइन’वर भातखळकर यांचे वृत्त प्रसिद्ध होताच त्यांनी लगेच आपली भूमिका स्पष्ट केली.

अस्लम शेख म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणे गरजेचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणे सोयीचे ठरणार आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पदे निर्माण करावीत, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.

------------------------------------