Join us  

मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 2:31 PM

सरत्या सहा महिन्यांत मुंबईतील मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने, व्यावसायिक कार्यालये अशी एकूण तीन लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे.

मुंबई : एकीकडे मुंबईत घरांच्या आणि कार्यालयांच्या खरेदीमध्ये जोरदार वाढ होत असली तरी दुसरीकडे कार्यालये भाड्याने घेण्याकडे कंपन्यांनी जोर लावल्याची माहिती या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. चालू वर्षाच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईत गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कार्यालय अथवा  दुकाने भाड्याने घेण्यात ४२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.

सरत्या सहा महिन्यांत मुंबईतील मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने, व्यावसायिक कार्यालये अशी एकूण तीन लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. जी जागा भाड्याने गेली आहे, त्यात सर्वाधिक प्रमाण हे कपड्यांच्या व फॅशन ब्रँडच्या दुकानांचे आहे. तीन लाख चौरस फुटांपैकी ४६ टक्के जागा कपड्यांच्या दुकानांनी व्यापली आहे. तर, हॉटेल व कॅफे यांची जागा भाड्याने घेण्याचे प्रमाण १२ टक्के इतके असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीमध्ये सर्वाधिक दुकाने ही मुंबईतील मॉलमधील आहेत. तर दक्षिण मुंबई, बीकेसी, अंधेरी व मालाड येथे मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी कार्यालये सुरू केली आहेत.

नव्या व्यावसायिक जागेची निर्मिती-

१) भाड्याने जागा घेण्यात बंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर असून सरत्या सहा महिन्यांत तिथे तब्बल दहा लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली शहर आहे. 

२) दिल्लीमध्ये गेल्या सहा महिन्यांत चार लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. मुंबईने तिसरा क्रमांक गाठला आहे. गेल्या सहा महिन्यांत मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही प्रमुख शहरांत एकूण पाच लाख चौरस फूट अशा नव्या व्यावसायिक जागेची निर्मिती झाली आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगदिल्लीबेंगळूर