Join us

मुंबई महापालिका शाळांची सुरक्षा अधिक सक्षम; सुरक्षेसाठी आणखी १,५५६ परिचर नेमणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:25 AM

मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता प्रशासनाकडून २४ तासांसाठी आणखी एक हजार ५५६ परिचर (अटेंडंट) नेमले जाणार आहेत. 

शाळांमध्ये वैयक्तिक हल्ले, कोणत्याही प्रकारची तोडफोड, संगणक, महागडे फर्निचर यासारख्या वस्तूंची चोरी रोखणे तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, याकडे ते लक्ष ठेवणार आहेत. शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराचे नियंत्रण त्यांच्या हाती असणारे आहे. त्यामुळे शाळांची सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे.

पालिका शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांमध्ये साडेतीन ते चार लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. तर, साडेसात हजारांपेक्षा जास्त शिक्षक अध्यापन करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने नुकताच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यामुळे शाळेच्या हद्दीतील एखादी घटना, प्रसंग किंवा गुन्हा त्यात कैद होऊ शकतो. मात्र, शाळेच्या परिसरातील अपरिचित व्यक्तींचा वावर, घुसखोरी रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक इमारतीच्या बाहेर परिचर नेमण्यात आले आहेत. मात्र, काही शाळांमध्ये ते अपुरे पडत असल्याने प्रशासनाकडून नव्याने आणखी परिचर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. 

...तर एजन्सी जबाबदार 

परिचरांची नेमणूक करणाऱ्या एजन्सीला संबंधित व्यक्तींची संपूर्ण माहिती, तपशील, फोटो, वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आदी माहिती पुरवावी लागणार आहे. परिचर यांच्याकडून काही चुकीची घटना घडल्यास संबंधित एजन्सी जबाबदार असणार आहे. 

परिचर यांची जबाबदारी अशी...

१) शाळेच्या प्रवेशद्वारातून कोणाला आत सोडायचे याचा निर्णय परिचर घेतील.

२)  शाळेच्या आवारात विशेषतः सुट्टीच्या दिवसांत अनधिकृत पार्किंग होणार नाही, याची खबरदारी घेणे. 

३) प्रवेशद्वारावर किंवा परिसरात अनधिकृत फेरीवाले, विक्रेते बसणार नाहीत, याची काळजी घेणे. 

४)  अग्निशमन सुरक्षेच्या सर्व अटी, नियम पाळले जात असल्याची खात्री करणे तसेच अग्निशमन  यंत्रणा, उपकरणे सुस्थितीत आहे, याची माहिती ठेवणे. 

५) शाळेचा परिसर धूम्रपान निषिद्ध क्षेत्र राहील, याकडे लक्ष ठेवणे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशाळा