‘निधी’अभावी रखडले गटाराचे काम!
By admin | Published: June 14, 2017 02:29 AM2017-06-14T02:29:43+5:302017-06-14T02:29:43+5:30
दहिसर पूर्वेकडील एस. एन. दुबे रोडमध्ये असलेले गटार गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आले आहे. कित्येक महिने उलटूनही आणि पावसाळा
- सागर नेवरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर पूर्वेकडील एस. एन. दुबे रोडमध्ये असलेले गटार गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आले आहे. कित्येक महिने उलटूनही आणि पावसाळा सुरू झाल्यानंतरही हे नागरी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे हे नागरी काम अर्धवट स्थितीत राहिल्याने येथे अपघात होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरण आणि गटाराचे काम पूर्ण झाले नाही. एस. एन. दुबे मार्गावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे गटार उघडे असल्याने
या ठिकाणी अपघात होऊ शकतो. रस्त्याच्या कडेला दुकाने
असून, दुकानदारांनी उघड्या गटारावर फळ्या टाकल्या आहेत. फळ्यांवरून जाणे धोकादायक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
नागरी कामासंदर्भात स्थानिक नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. गटाराच्या कामासाठी निधी आवश्यक आहे; तो उपलब्ध होत नाही. त्यामुळे काम रखडले आहे. पालिकेकडे कामाचा पाठपुरावा करण्यात आला आहे. रस्त्यावरील गटार बुजवून रस्त्यांलगत नवीन गटार बांधले
जाणार आहे. गटाराचा काही भाग रस्त्यामध्ये येत असून, ते बाजूला
घेतले जाईल. मग रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल.
एस. एन. दुबे रोड हा रुंदीकरणामध्ये गेला आहे. पहिल्यांदा तो डीपी रोड होता. डीपी रोड डेव्हलप केला आहे. या ठिकाणी जी अनधिकृत बांधकामे होती ती हटविण्यात आली आहेत. पात्र बांधकामांचा विचार करीत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कारणामुळे गटार रस्त्याच्या मधोमध आले आहे. नूतनीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला असून, निविदा मंजूर झाली की तीन ते चार महिन्यांत काम पूर्ण होईल.
- संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त, आर/उत्तर