मुंबई : मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत अवयव प्रत्यारोपणासाठी एखादा अवयव रस्तेमार्गे घेऊन जाण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत ‘ग्रीन कॉरिडोर’ केला जातो. आता असेच काम रेल्वेमार्गावरूनही होऊ शकते. मध्य रेल्वेची सुसज्ज अशी ‘रेल्वे रुग्णवाहिका’अवयव प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या अवयवांची ने-आण करण्यासाठी सज्ज करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक ती पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची गरज असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. मध्य रेल्वेकडून भारतातील पहिली रेल्वे रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका मुंबईतून लोणावळा येथे नेण्यात आली. त्या वेळी त्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक ए.के. श्रीवास्तव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल, मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. रेल्वे रुळांवर एखादा मोठा अपघात घडल्यास ही रुग्णवाहिका वापरली जाते. या रुग्णवाहिकेला वातानुकूलित चार डबे असून, यात ४०० ते ५०० रुग्णांसाठीची सुविधा, छोट्या शस्त्रक्रिया आणि विविध तपासण्या करण्याची सोय आहे. (प्रतिनिधी)रुग्णवाहिकेला कुंभमेळ्याचे निमित्त दीड वर्षापूर्वी कुंभमेळ्याच्या निमित्ताने मध्य रेल्वेकडून ही रुग्णवाहिका तयार करण्यात आली होती. आतापर्यंत रेल्वेच्या रुग्णवाहिकेने सोलापूर विभागात वाडी येथे ६८१ रुग्णांना, नागपूर विभागात भांडक येथे २९२ जणांना, भुसावळ विभागात धुळे येथे १५० रुग्णांना विविध प्रकारची सेवा दिली आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी लागणारे अवयव रस्ते मार्गाने नेताना शासनाची मोठी यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे मार्ग बंद ठेवावे लागतात. जर हेच काम रेल्वेमार्गाने झाले तर ते अधिक सोपे होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
अवयवांची ने-आण करण्यास रेल्वेमार्गावरूनही ‘ग्रीन कॉरिडोर’ शक्य
By admin | Published: March 10, 2017 4:35 AM