पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच ग्रीन कॉरिडोर

By admin | Published: May 14, 2016 02:40 AM2016-05-14T02:40:02+5:302016-05-14T02:40:02+5:30

हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्यानंतर प्रथमच पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस-वे’वरून हृदय अवघ्या १ तास ३५ मिनिटांत मुंबईत आणण्यात यश मिळाले आहे

Green Corridor for the first time on Pune-Mumbai route | पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच ग्रीन कॉरिडोर

पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच ग्रीन कॉरिडोर

Next

मुंबई : हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्यानंतर प्रथमच पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस-वे’वरून हृदय अवघ्या १ तास ३५ मिनिटांत मुंबईत आणण्यात यश मिळाले आहे. गुरुवारी मध्यरात्री पहिल्यांदाच पुणे ते मुंबई मार्गावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. त्यामुळे १४ वर्षीय मुलाला जीवनदान मिळाले आहे.
२८ वर्षीय मुलाचा अपघात झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातात या मुलाच्या डोक्याला जबर मार बसला होता. या मुलाला गुरुवारी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हृदय, दोन मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. या मुलामुळे चार जणांना जीवनदान मिळाले. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात गेली चार महिने प्रतीक्षा यादीत असलेल्या १४ वर्षीय मुलाला त्यामुळे हृदय मिळाले. मुंबईतील ही १७वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.
बोरीवली येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाला कार्डिओ मायोपॅथी या हृदयाच्या आजाराने ग्रासले होते. हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. गेल्या चार महिन्यांपासून हा मुलगा हृदयाच्या प्रतीक्षेत होता.
गुरुवारी मध्यरात्री पुण्याहून रात्री १ वाजून ३८ मिनिटांनी हृदय घेऊन रुग्णवाहिका निघाली. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरून मुलुंडच्या रुग्णालयात हृदय घेऊन येण्याचा रस्ता निश्चित करण्यात आला. यासाठी तब्बल १५० पोलीस तैनात करण्यात आले होते. १८८ किलोमीटरचे अंतर कापून मध्यरात्री ३ वाजून १३ मिनिटांनी रुग्णवाहिका फोर्टिस रुग्णालयात पोहोचली. तत्काळ हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. १४ वर्षीय मुलावर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, डॉक्टरांच्या देखरेखीसाठी मुलाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले. डॉ. मुळे म्हणाले की, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पण, पुढचे ४८ ते ७२ तास महत्त्वाचे असल्यामुळे रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)१पहिल्यांदाच पुण्यापासून रस्ते मार्गाने मुंबईत हृदय आणले गेले आहे. सामान्यपणे पुणे-मुंबई प्रवास रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी साडेतीन ते चार तासांचा कालावधी लागतो. पण, पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी मध्यरात्री नवीन मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता.
२हा ग्रीन कॉरिडोर तयार करण्यासाठी १५० पोलीस तैनात होते. यामध्ये पुणे, रायगड, ठाणे आणि मुंबईच्या पोलिसांचा समावेश होता. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच पुण्याहून मुंबईचे १८८ किमीचे अंतर अवघ्या १ तास ३५ मिनिटांत कापणे शक्य झाले.

Web Title: Green Corridor for the first time on Pune-Mumbai route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.