ठाणे : मुलुंड येथील फोर्टीस इस्पितळात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ४८वर्षीय महिलेला तातडीने हृदय हवे होते. नालासोपाऱ्यात ५५वर्षीय महिला रेल्वे अपघातात ब्रेन डेड झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचे हृदय व अन्य महत्त्वाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहाटे ४ वाजता येथील ज्युपिटर हॉस्पिटलने वाहतूक विभागाला एक धडधडते हृदय तातडीने १२ किमी अंतरावर पोहोचवायचे असल्याचे सांगितले. अल्पावधीत वाहतूक विभागाने चोख बंदोबस्त केला. सकाळी ७.२१ वाजता हृदय घेऊन ज्युपिटरमधून बाहेर पडलेली रुग्णवाहिका २५ मिनिटांचे अंतर केवळ ८ मिनिटांत पार करून ७.२९ वाजता फोर्टीस रुग्णालयात दाखल झाली आणि एका महिलेला जीवनदान मिळाले.वाहतूक विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. गौतम रामाकांथन आणि फोर्टीसचे अन्वय मुळे यांच्या संयुक्त प्रयत्नाने ठाण्यात परस्परांशी रक्ताचे नाते नसलेल्या दोन ‘भगिनीं’मध्ये नवा बंध गुंफला गेला.ज्युपिटर ते मुलुंड फोर्टीस हे वाहतुकीचा ताण नसताना २५ मिनिटांत पार केले जाणारे अंतर सकाळच्या वेळी अवघ्या ८ मिनिटांत पार करणे, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. ज्युपिटर ते आनंदनगर जकात नाका हे अंतर रुग्णवाहिकेने अवघ्या ३ मिनिटांत पार केल्यानंतर उर्वरित अंतर ५ मिनिटांत पार करून रुग्णवाहिकेने फोर्टीस गाठले. ज्या महिलेस हृदय मिळाले, ती हृदय कंपोजनंतर गेली २० वर्षे औषधोपचारावर होती. बुधवारी सकाळी ४ वा.च्या ठाणे वाहतूक नियंत्रण कक्षाचा फोन खणखणला. त्या फोनवरून ठाणे ज्युपिटर हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगण्यात आले. एका ५५वर्षीय महिलेचे हृदय प्रत्यारोपणाकरिता मुलुंड फोर्टीज हॉस्पिटलमध्ये कमीतकमी वेळेत नेले, तर एकाला जीवनदान मिळणार असल्याचे कळवण्यात आले. या वेळी ड्युटीवरील साहेबराव सूर्यवंशी यांनी ही माहिती तातडीने वरिष्ठांना दिली. त्यानुसार, ग्रीन कॅरिडोअर मोहिमेच्या हालचालीस सुरुवात झाली. उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिका विनाअडथळा रुग्णालयापर्यंत पोहोचण्याकरिता वॉकीटॉकीवरून रस्ता मोकळा करण्याची योजना केली. या वेळी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली.२५ मिनिटांचे अंतर केवळ ८ मिनिटांत पार५५वर्षीय महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ब्रेन डेड झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी नातेवाइकांना दिली. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेत ज्युपिटर हॉस्पिटलशी संपर्क साधला. डॉक्टरांचे पथक रवाना झाले. तेथून महिलेस ठाण्यात आणून हृदय, यकृत, दोन्ही किडन्या, डोळे असे अवयव दान करण्यात आले. हृदय, एक किडनी मुंबईत, तर यकृत व दुसरी किडनी आणि डोळे दान करण्यात आल्याची माहिती ज्युपिटरचे डॉ. गौतम रामाकांथन यांनी दिली. एक वेगळे काम करून दाखवण्याची संधी मिळाली. पुढेही अशी संधी मिळाली तर ठाणे पोलीस तयार आहेत. यानिमित्ताने अवयवदानाचे महत्त्व लोकांना समजेल.- डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग
ग्रीन कॉरिडोरने महिलेला जीवदान
By admin | Published: February 11, 2016 1:47 AM