Join us

पूर्व द्रुतगती मार्गावर ‘ग्रीन कॉरिडॉर’; मुंबईत हरित आच्छादन वाढविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 10:34 AM

मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरील पदपथ दिसेनासे झाले होते. मात्र आता ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले असून, त्या ठिकाणी ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवले जाईल.

मुंबई : मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरील पदपथ दिसेनासे झाले होते. मात्र आता ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले असून, त्या ठिकाणी ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवले जाईल जेणेकरून नागरिकांना त्यावरून सुखद अनुभवासह फिरता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

पालिकेच्या रविवारी पार पडलेल्या महास्वच्छता अभियानात मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत हरित आच्छादन वाढवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू असून, उपलब्ध मोकळ्या जागांवर झाडे लावण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी स्वच्छतेचा पॅटर्न राज्यभर विस्तारण्यात येणार आहे. हा पॅटर्न संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

२७ किलोमीटरचा वनपट्टा तयार करणार :

स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासोबतच शक्य तेथे पर्यावरणपूरकता जपा, असे त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई पालिकेच्या हद्दीलगत ठाणे भागात २७ किलोमीटरचा वनपट्टा तयार करण्याचा निर्णय नुकताच घेतल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मोहिमेमुळे मुंबईची हवा सुधारली मुंबईत सुरू असलेल्या डीप क्लिनिंग मोहिमेमध्ये आतापर्यंत १३ विभागात ही मोहीम राबविण्यात आली असून, २२ हजार किलोमीटर अंतर होईल, इतक्या लांबीचे रस्ते धुवून काढण्यात आले आहेत. राडारोडा आणि कचरा उचलण्याच्या मोहिमेमुळे  हवा गुणवत्तेचा निर्देशांक ३५०वरून निम्म्यावर आला आहे. काही ठिकाणी तर तो ९० च्याही खाली आला असल्याचे स्पष्ट केले. मुंबई स्वच्छ अभियान आता जनचळवळीत परावर्तित झाले असून, मुंबई मॉडेल देशासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. - डॉ. इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

मुंबईतील लहानसहान परिसर, गल्लीबोळातील भाग स्वच्छ करून आरोग्यदायी वातावरण राहील, अशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. शिवाय लवकरच ज्येष्ठांसाठी डे केअर केंद्र सुरू करण्यात येणार आहे - दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदे