ग्रीन कॉरिडॉरने वाचवले महिलेचे प्राण

By admin | Published: September 17, 2016 02:40 AM2016-09-17T02:40:22+5:302016-09-17T02:40:22+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षायादीवर असलेल्या बुलढाण्याच्या एका ३० वर्षीय महिलेला अखेर जीवनदान मिळाले आहे.

Green Corridor saved woman's life | ग्रीन कॉरिडॉरने वाचवले महिलेचे प्राण

ग्रीन कॉरिडॉरने वाचवले महिलेचे प्राण

Next

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षायादीवर असलेल्या बुलढाण्याच्या एका ३० वर्षीय महिलेला अखेर जीवनदान मिळाले आहे. अवघ्या १ तास ६ मिनिटांत १५ सप्टेंबर रोजी पुण्याहून मुंबईत हृदय आणले गेले. त्यानंतर या महिलेवर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
बुलढाणा येथे राहणाऱ्या या महिलेला हृदयाचा दुर्मीळ आजार झाला होता. मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. पण, औषधोपचारांपेक्षा हृदय प्रत्यारोपण हा तिच्यासाठी पर्याय होता. गेल्या तीन वर्षांपासून ती प्रतीक्षायादीत होती. पण, तिला हृदय मिळत नव्हते. पुण्यातील एका ३१ वर्षीय व्यक्तीला १५ सप्टेंबर रोजी ‘ब्रेनडेड’ घोषित करण्यात आले. त्यानंतर पुणे ते मुंबई हे १३३.५२ किमीचे अंतर ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवघ्या १ तास ६ मिनिटांत कापून त्याचे हृदय मुंबईला आणण्यात आले.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये या व्यक्तीला दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्याच्या नातेवाईकांनी हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान करून चौघांना जीवनदान दिले आहे.
दरम्यान, महिलेवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पुढचे ४८ ते ७२ तास या महिलेला देखरेखीखाली ठेवले जाणार असून, तिची प्रकृती सुधारल्यावर तिला वॉर्डमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात येईल. हृदयदान होत असल्यामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कार्डिअ‍ॅक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांनी दिली. (प्रतिनिधी)



कुठे केला होता ग्रीन कॉरिडॉर?
जलद गतीने पुण्याहून हृदय मुंबईत आणण्यासाठी विमानतळाच्या रस्त्यावर आणि पुणे, मुंबईतल्या रस्त्यांवर ग्रीन कॉरिडॉर केला होता.
हृदयाचा प्रवास
११.३८ मिनिटांनी पुण्यातील रुबी रुग्णालयातून हृदय घेऊन रुग्णवाहिका निघाली.
११.५० मिनिटांनी रुग्णवाहिका पुणे विमानतळावर पोहोचली.
११.५५ मिनिटांनी पुणे विमानतळाहून विमानाने उड्डाण केले.
१२.२० मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर पोहचले.
१२.४३ मिनिटांनी हृदय फोर्टिस रुग्णालयात पोहचले. पुण्यात अनंत चतुर्दशीची जोरदार धामधूम असतानाही रुबी हॉल क्लिनिकमधून या युवकाचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत तीन ठिकाणी नेण्यासाठी तीन ठिकाणी ग्रीन कॉरीडॉर करण्यात आला होता.
हृदय ग्रीन कॉरीडॉरमार्फत लोहगाव विमानतळावर अवघ्या आठ मिनिटांत पोहोचविण्यात आले. याच रुग्णाचे मूत्रपिंड नाशिक येथे ग्रीन कॉरीडॉरच्या माध्यमातून पाठविण्यात आली तर तर यकृत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले.

Web Title: Green Corridor saved woman's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.