तेजस एक्स्प्रेसला १७ जानेवारीला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 03:18 AM2019-12-29T03:18:49+5:302019-12-29T03:19:52+5:30
नियमित सेवेत १९ जानेवारीपासून दाखल होणार
मुंबई : खासगी तत्त्वावरील मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसला १७ जानेवारीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर १९ जानेवारीपासून ती नियमित धावेल.
अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस १७ जानेवारी २०२० रोजी अहमदाबादहून सकाळी ९.३० वाजता सुटेल. मुंबई सेंट्रल स्थानकात ती सायंकाळी ४ वाजता पोहोचेल. याच दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता मुंबई सेंट्रलहून तेजस एक्स्प्रेस सुटेल. अहमदाबाद येथे ११.३० वाजता पोहोचेल. १९ जानेवारी २०२०पासून अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेसची सेवा नियमित सुरू होईल. आठवड्यातील गुरुवार वगळता सहा दिवस तेजस एक्स्प्रेस धावेल. अहमदाबादहून सकाळी ६.४० वाजता ही गाडी सुटेल. मुंबई सेंट्रल येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्याच दिवशी मुंबई सेंट्रलहून दुपारी ३.४० वाजता ही गाडी सुटेल. अहमदाबाद येथे रात्री ९.५५ वाजता पोहोचेल. ती नडियाड, बडोदा, भरूच, सुरत, वापी, बोरीवली या स्थानकांवर थांबेल.
‘शताब्दी’च्या धर्तीवर ‘तेजस’ची भाडे आकारणी ‘डायनॅमिक’ स्वरूपाने होईल. गर्दी नसलेल्या काळात हे भाडे याच मार्गावर धावणाऱ्या ‘शताब्दी’एवढे असेल. गर्दीच्या काळात भाडे २० टक्के तर सणासुदीच्या हंगामात ३० टक्के जास्त असेल. गाडीच्या तिकिटासह २५ लाख रुपयांपर्यंतचा प्रवासविमा विनामूल्य दिला जाईल.
विलंब झाल्यास मिळणार भरपाई
गाडीला एक तासाहून अधिक विलंब झाल्यास प्रवाशांना प्रत्येकी १०० रुपये व दोन तासांहून अधिक विलंब झाल्यास प्रत्येकी २०० रुपये भरपाई दिली जाईल.
गाडी रद्द झाल्यास कन्फर्म व वेटिंग ई- तिकिटे असलेल्या प्रवाशांची भाड्याची पूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात परतावा म्हणून आपोआप जमा होईल. अशा वेळी प्रवाशांनी तिकिटे रद्द करण्याची किंवा टीडीएस फॉर्म बरण्याची गरज असणार नाही.