परेकडून एसी लोकलला हिरवा कंदील
By admin | Published: January 13, 2017 06:03 AM2017-01-13T06:03:26+5:302017-01-13T06:03:46+5:30
मुंबईत दाखल झालेली एसी लोकल मध्य रेल्वेवर धावणार की पश्चिम रेल्वेवर अशी चर्चा गेले काही दिवस सुरु होती.
सुशांत मोरे / मुंबई
मुंबईत दाखल झालेली एसी लोकल मध्य रेल्वेवर धावणार की पश्चिम रेल्वेवर अशी चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र आता या चर्चेला विराम मिळणार असून एसी लोकल चालवण्यास पश्चिम रेल्वेने हिरवा कंदील दाखवला आहे. हा अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली.
सात महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल झाली. या लोकलमधील काही तांत्रिक समस्या सुटल्यानंतर कारशेडमध्ये लोकलच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. तत्पूर्वी एसी लोकलच्या जादा उंचीचाही मुद्दा समोर आला. लोकलची उंची जादा असल्याने कुर्ला ते सीएसटी दरम्यान कमी उंचीचे पुल आणि ओव्हरहेड वायर यामुळे तांत्रिक समस्या उद्भवल्याने लोकल चालवू शकत नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट झाले. त्यानुसार एसी लोकल पश्चिम रेल्वेने चालवावी अशी विनंती मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेला करतानाच रेल्वे बोर्डालाही केली. रेल्वे बोर्डाने यावर पश्चिम रेल्वेला विचारणा केल्यानंतर एसी लोकल चालवण्यासाठी चाचपणी करण्यात आली. चर्चगेट ते वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेप्रमाणेच अडचणी येत असल्याचे पश्चिम रेल्वेच्या निदर्शनास आले. मात्र या अडचणी सुटू शकत असल्याने तसा सकारात्मक प्रस्तावच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आला. यावर पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकल चालवण्यात कोणताही अडथळा नसल्याचा अहवाला तयार केला असून हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले. अहवालानुसार एसी लोकलला येणारे तांत्रिक अडथळे सोडवण्यात येतील, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
पश्चिम रेल्वेवर असलेल्या अडचणी
चर्चगेट ते वांद्रे दरम्यान तांत्रिक अडचणी आहेत. यात माहिम व माटुंगा येथे कमी उंचीच्या पुलाची तर महालक्ष्मी येथे ओव्हरहेड वायरची अडचण आहे.
माहिम व माटुंगा येथील दोन्ही पुल तोडण्यात येणार असून ते नव्याने बांधण्यात येतील. त्यावेळी त्यांची उंची वाढवण्यात येईल.
त्याचचप्रमाणे महालक्ष्मी आणि परिसरात ओव्हेरहेड वायरचीही कमी उंची आहे. त्या ठिकाणी रेल्वे रुळ खाली करुन किंवा ओव्हरहेड वायर वर करुन ही समस्या सोडवू शकतो.
सध्या एसी लोकल कारशेडमध्येच उभी आहे. कारशेडबाहेर घेण्यात येणाऱ्या चाचणीसाठी आरडीएसओ (रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन)आणि सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरीच्या प्रतिक्षेत लोकल आहे.
या लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर १२ आठवडे चाचण्या चालतील. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरही लोकलच्या चाचण्या होतील. तत्पूर्वी पश्चिम रेल्वेवर लोकल चालवण्यास बोर्डाकडून मंजुरी मिळाली तर एसी लोकलच्या चाचणीचा प्रश्नही उद्भवू शकतो.