Join us  

निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 5:20 AM

या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात यंदा नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज सुरू होईल.

मुंबई : निसर्गोपचार पद्धतीने विविध आजारांवर उपचार घेण्याचे प्रमाण  वाढले असून यासाठी खासगी व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. मात्र या विषयाचे शास्त्रोक्त शिक्षण मिळावे म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागातील आयुष संचालनालयाअंतर्गत यंदापासून बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्सेस या नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात यंदा नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज सुरू होईल. या अभ्यासक्रमाला बारावी विज्ञान शाखेतील गुणांच्या आधारावर पहिल्या वर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. या विषयाचा  पदवी अभ्यासक्रम बनविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या संस्थेची मदत घेतली आहे.  अभ्यासक्रम अंतिम मंजुरीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला आहे.

अभ्यासक्रम

हा अभ्यासक्रम साडेचार वर्षाचा असून त्यांनतर एक वर्ष इंटर्नशिप करणे अनिवार्य असेल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पदवी देण्यात येईल. शासनाने कॉलेजच्या परवानगीबरोबरच ६० बेड्सच्या नॅचरोपॅथी रुग्णालयालाही मंजुरी दिली आहे.  ‘शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय’ असे  त्याचे नामकरण केले आहे.

जुनाट आजारांवर लाभदायी

 निसर्गोपचारामध्ये अर्थात उष्णता, वनस्पती, फळे, ध्वनी, पाणी आणि  सूर्यप्रकाश अशा नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो.  या पद्धतीमध्ये ॲलोपॅथीचा वापर किंवा शस्त्रक्रियांचा अतर्भाव करण्यात येत नाही. काही खासगी संस्था यामध्ये काही वर्षांपासून काम करत आहेत.

 तज्ज्ञांच्या मते, जुनाट आजार दूर करण्यासाठी या उपचारपद्धतीची प्रामुख्याने मदत घेण्यात येते. यामध्ये नैसर्गिक घटक जुनाट आजाराच्या मुळाशी जाऊन तो बरा असतात. याचे सहसा दुष्परिणामही होत नाहीत.

पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयासाठी या विषयातील तज्ज्ञांची मदत सध्या घेण्यात येत आहे. मुळात अशा पद्धतीचा अभ्यासक्रम केरळ आणि तामिळनाडू राज्यात यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. आपल्याकडे यंदा सुरू होत आहे. पहिली बॅच येत्या महिनाभरात सुरू होण्याची शक्यता आहे.

- प्रोफेसर वैद्य रमण घुंगराळेकर, संचालक, आयुष संचालनालय