अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती; प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका अरबी समुद्रात ३०० एकरवर भराव टाकून ‘ग्रीन पार्क’ उभारत असली तरी यास मच्छीमार समाजाने विरोध करीत ग्रीन-पार्कमुळे समुद्रातील जैविकता नष्ट होईल, समुद्रातील कोरल्स, वनस्पती, माशांचे प्रजनन क्षेत्र नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे; शिवाय हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची त्यांची मागणी असून, प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने सरकारला दिला आहे.
पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली जाण्याचे प्रमाण वाढले असून, कोस्टल रोड यात आणखी भर घालणार आहे. दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, वरळी, कफपरेड इत्यादी ठिकाणी समुद्रातले पाणी रस्त्यावर आल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यात आता ग्रीन पार्कही अशीच परिस्थिती निर्माण करणार आहे. ३०० एकर समुद्रात भर टाकून मुंबईचा इटलीतील वेनिस शहर करण्याचा प्रताप मनपा आणि राज्य प्रशासनाचा आहे. मुंबईचे शांघाय आणि आता मुंबईचा वेनिस करता करता कदाचित आमची मुंबई हरवून बसण्याची वेळ आमच्या पिढीवर येणार आहे, अशी खंत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली.
सदर परिसरात ४०० पेक्षा जास्त नौकाधारक असून २५ हजार मच्छीमार मासेमारीतून उपजीविका चालवतात. पार्कमुळे मच्छीमारांना जाण्या-येण्यापासून वंचित ठेवून त्यांच्या रोजगारातही अडथळा निर्माण हाेणार आहे. वेळ आणि आर्थिक नुकसान होणार आहे, असे मत समितीने मांडले आहे.
..........................