मुंबई लोकलच्या मेक ओव्हरला ‘अधिवेशना’त हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 03:08 AM2018-11-22T03:08:18+5:302018-11-22T03:08:34+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वेचा ‘मेक ओव्हर’ करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ ए (एमयूटीपी ३ ए) ला हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाची मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत.
- महेश चेमटे
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा ‘मेक ओव्हर’ करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ ए (एमयूटीपी ३ ए) ला हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाची मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंजुरी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
५५ हजार कोटींचा एमयूटीपी-३ ए हा प्रकल्प रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या विशेष प्रकल्पांपैकी एक आहे. साधारणपणे कोणत्याही रेल्वे प्रकल्पाला मंजुरीसाठी सुरुवातीला राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असते. त्यांच्या मंजुरीनंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जातो. केंद्राकडून रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर निती आयोग व प्रकल्पांच्या निधीच्या मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात येतो. या संपूर्ण प्रक्रियेनंतर संबंधित प्रकल्पाच्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. मात्र ‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूद करून काम सुरू करण्याची सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली.
एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराणा यांना एमयूटीपी ३ ए प्रकल्पाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री यांच्यासोबत एमयूटीपी ३ एच्या राज्य मंजुरीसाठी नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत मुंबई रेल्वेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून तातडीने मंजुरी देण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येणार असल्याचे खुराणा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तब्बल ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पाच्या मंजुरीबाबत ‘अभी नही तो कभी नही’ अशी चर्चा सुरू आहे. यामुळे प्रकल्पाच्या मंंजुरीसाठी एमआरव्हीसीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्याच्या मंजुरीनंतर उर्वरित मंजुरी प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होईल. यामुळे प्रकल्पाचे काम डिसेंबर किंवा जानेवारी २०१९ मध्ये सुरू होईल. ‘एमयूटीपी ३ ए’च्या कामांसाठीच्या निविदा तयार असून राज्याच्या मंजुरीनंतर तातडीने निविदा मागविण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. मात्र ‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करून काम सुरू करण्याची सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.
एमयूटीपी ३ ए प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्रकल्पाचे नाव प्रकल्प खर्च
(कोटींमध्ये)
२१० वातानुकूलित लोकल १७,३७४
सीएसएमटी-पनवेल उन्नत मार्ग १२,३३१
बोरीवली-विरार पाचवा-सहावा मार्ग २,१८४
पनवेल-विरार कॉरिडोर ७,०८९
गोरेगाव-बोरीवली हार्बर विस्तार ८२६
कल्याण-आसनगाव चौथा मार्ग १,७५९