कॉसमॉसला दिला होता ग्रीन सिग्नल

By admin | Published: October 18, 2015 01:56 AM2015-10-18T01:56:16+5:302015-10-18T01:56:16+5:30

कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील राजकीय गोल्डन गँग आणि काही अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता,

The green signal was given to the cosmos | कॉसमॉसला दिला होता ग्रीन सिग्नल

कॉसमॉसला दिला होता ग्रीन सिग्नल

Next

ठाणे : कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील राजकीय गोल्डन गँग आणि काही अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरूकेला आहे. कॉसमॉसच्या काही प्रकल्पांत अनियमितता असल्याचा ठपका स्थायी आणि महासभेत नगरसेवकांनी ठेवला होता, परंतु ज्या प्रकल्पात अनियमितता होती, ती दुरूस्त झाली असून, त्यातील अडथळे दूर झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी परमार यांच्या विविध प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळेच पालिकेची फसवणूक होऊ नये, या उद्देशाने स्थायी आणि महासभेत यावर चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, परमार यांनी या संदर्भात गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रकल्पांचा फेरविचार करावा, अशा सूचना त्यांनी ठाणे पालिकेला दिल्या होत्या. त्यानंतर कॉसमॉस होराइझन प्रकल्पाच्या ठिकाणी रस्ते खोदून नुकसान केल्याप्रकरणी महापालिकेने नोटीस बजावली होती, परंतु त्या ठिकाणची जलवाहिनी आणि रस्त्याचे काम करण्याची हमी परमार यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम पालिकेकडे भरणा केली होती. त्यामुळे त्यांच्यावर या संदर्भात आकारलेला दंड नुकताच रद्द केला आहे, तसेच येथील वापरलेल्या जागेच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका बदलल्याने, हे प्रकरण मार्गी लागल्याचा दावा पालिकेने केला आहे. कॉसमॉस ज्वेल्सच्या ठिकाणी जी जागा त्यांनी वापरली होती, ती हस्तांतरित करण्याची हमी दिल्याने ते प्रकरणही आता संपुष्टात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, मुल्ला यांनी केलेला दावा आणि आता पालिकेने विषद केलेल्या भूमिकेमुळे, पालिकेने आपलीही बाजू सेफ करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

कारवाई दसऱ्यानंतरच
कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी केलेल्या आत्महत्येचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाईचे सीमोल्लंघन हे दसऱ्यानंतरच होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
परमार यांनी लिहिलेली सुसाइड नोट सध्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. लॅबचा अहवाल आल्यानंतर चिठ्ठीतील नावे उघड होणार आहेत, तसेच त्यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. ही रोजनिशीदेखील पोलिसांच्या हाती लागली आहे.
या दोन्ही पुराव्यांच्या आधारे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणात गुंतलेले लोक बडी आसामी असल्यामुळे नवरात्रीच्या काळात त्यांना ताब्यात घेतल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे दसऱ्यानंतरच कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


‘‘गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या प्रकल्पांचा फेरविचार केल्यानंतर यातील अडथळे बऱ्याच अंशी दूर झाले होते, तसेच परमार यांनीही आपली भूमिका बदलली होती.’’
- संजीव जयस्वाल, आयुक्त, ठामपा.

Web Title: The green signal was given to the cosmos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.