मेट्रोच्या खांबांखाली हिरवळ अन् झगमगाट; बॅनर्स, पोस्टर्स हटविण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:40 PM2023-11-20T12:40:38+5:302023-11-20T12:42:37+5:30
मुंबई प्रदेशातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एमएमआरडीए मेट्रोचे जाळे शहर तसेच उपनगरात विणत आहे.
मुंबई प्रदेशातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एमएमआरडीए मेट्रोचे जाळे शहर तसेच उपनगरात विणत आहे. पश्चिम उपनगरात मेट्रो यापूर्वीच धावत असून या मेट्रोच्या खांबाखाली सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतला आहे. मेट्रोच्या खांबांना रंग, रंगीत फुलांची झाडे, पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ असा मेकओव्हर करण्यात येणार आहे.
बेकायदेशीर बॅनर्स, पोस्टर्स, जाहिराती हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच मुंबईसह विविध पालिकांना दिले आहेत. असे असतानाही शहरात बेकायदा बॅनर्स होर्डिंग्ज वाढतच चालली आहेत. मुंबईतून धावणाऱ्या घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १, दहिसर ते डीएन नगर मेट्रो २ अ, दहिसर ते अंधेरी मेट्रो ७ च्या खांबांवर बेकायदेशीर होर्डिंग्ज तसेच जाहिराती चिकटवल्या आहेत. वडाळा-घाटकोपर-ठाणे या मेट्रो-४ मार्गिकेच्या खांबांचा कायापालट ठाण्यात करण्यात आला आहे. या ठिकाणी चालण्याजोगे पदपथ तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी काळोख पडू नये यासाठी विजेचे दिवेदखील लावले आहेत. तसेच या ठिकाणी लावलेल्या झाडांची वेळच्या वेळी निगा राखली जात असून असाच प्रयोग इतर मेट्रो मार्गांवर देखील केला जाणार आहे.
>> हे मेट्रो मार्ग चांगले दिसावेत याची देखील एमएमआरडीएकडून काळजी घेतली जात आहे.
>> एमेमआरडीए या मेट्रोमार्गखालील खांबांचे, पुलांचे राखाडी रंग देणार आहे.
>> काही ठिकाणी हे काम करण्यात आले असून इतर ठिकाणी लवकरच ही कामे हाती घेतली जाणार आहेत.
शुभेच्छा देणारे फलक
दिवाळी निमित्ताने विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावल्याने एकेका खांबावर बॅनर्सची भाऊ गर्दी झाली आहे. बेकायदेशील होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात एमएमआरडीएकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. मात्र सणासुदीच्या काळात या बॅनर्सची संख्या वाढल्याने एमएमआरडीएचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.