कॉर्पोरेट कंपन्या, संस्थांच्या परिसरात बहरणार हिरवळ; विमानतळ परिसरात चार हजारांहून अधिक झाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:00 AM2024-04-26T11:00:47+5:302024-04-26T11:05:21+5:30
विमानतळाच्या २० एकर जागेवर फुललेल्या हिरवळीची भुरळ आता कॉर्पोरेट कंपन्यांनाही पडली आहे.
मुंबई :विमानतळाच्या २० एकर जागेवर फुललेल्या हिरवळीची भुरळ आता कॉर्पोरेट कंपन्यांनाही पडली आहे. आपल्या कंपन्या-आस्थापनांचा परिसर हिरवागार असावा, यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याला साद घातली आहे. विमानतळ परिसर सुंदर आणि हिरवागार असावा, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पालिकेकडे संपर्क साधला होता.
त्यावेळी उद्यान खात्याने त्यांना सूचना करताना काही त्रुटीही दूर करण्यास सांगितले. विमानतळ प्राधिकरणाने परिसरातील २० एकर जागेवर हिरवळ फुलवली. टर्मिनल १ आणि २ च्या परिसरात १२५ प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आहेत. एक हजार चौरस मीटरचे व्हर्टिकल उद्यानही उभारण्यात आले. पालिकेच्या मालकीच्या व्यतिरिक्त मुंबईत मोठे भूखंड अन्य शासकीय, निम-शासकीय व खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत. या संस्थांची भागीदारी लक्षणीय आहे.
फिरते गार्डन -
१) मुंबई विमानतळाच्या परिसरात व्हर्टिकल उद्यानात पोर्टेबल-मोबाइल गार्डन उभारण्यात आले आहे. ते एक जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येते. पोर्टेबल गार्डनमध्ये रोपट्यांची भिंत उभारली जाते. त्यात आकर्षक झाडे लावली जातात.
२) मुंबई हरित करण्यासाठी पालिकेसोबत या संस्थांचीही जबाबदारी आहे. विशेष म्हणजे, या खासगी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या पुढाकार घेऊ लागल्या आहेत. जे. एस. डब्ल्यू, महिंद्रा गोदरेज यासारख्या मोठ्या कंपन्यांनी पालिकेला प्रतिसाद दिला आहे.
३) यापैकी काहींनी उद्यान खात्यासोबत बैठकाही घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात या कंपन्यांचे परिसर हिरवेगार झाल्याचे पाहायला मिळतील. मुंबई हरित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उद्यान खात्याने विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. विविध प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत.