मुंबई: मुंबईतील मालाड, मालवणी येथील एक अतिक्रमण झालेला भूखंड मोकळा करून त्यावर नोएडाच्या धर्तीवर वैदिक थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल सहा एकर जागेवर हे उद्यान विकसीत होणार आहे. यासाठी तेथील अनधिकृत फर्निचर दुकानांवर पालिकेकडून कारवाई ही करण्यात आली आहे. त्यामुळे ६.९१ एकरचा भूखंड पार्कच्या जागेसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आत या जागेवर पालिकेकडून २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूनिम, जांभूळ, अर्जुन इत्यादी झाडे असणार आहेत.
महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात चारकोप नाका परिसरात ७ एकर क्षेत्रात वैदिक थीम पार्क उभारले जात असून या ठिकाणी नागरी वन उपक्रम अंतर्गत (मियावाकी जंगल) उद्यान, वृक्षारोपण, संरक्षक भिंत व इतर सुविधांचा भूमिपूजन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी , आमदार आशीष शेलार आणि पालिका अधिकारी उपस्थित होते. याशिवाय खासदार-अभिनेत्री हेमा मालिनी, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या.
यावेळी इतक्या मोठ्या भूखंडावर अशा प्रकारचे वैदिक थीम पार्क उभे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि प्रशासनाने ती समस्यादेखील मार्गी लावली. आता येथे लवकरच अतिशय दर्जेदार उद्यान उभारले जाईल, असा विश्वास उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला. तसेच सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी प्रास्ताविकात वैदिक थीम पार्क संकल्पना समजावून सांगितली. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प हाती घेतला. लवकरच हे उद्यान मुंबईकरांच्या सेवेसाठी खुले करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
८८०० विविध प्रकारची झाडे बहरणार
या उद्यानात २२०० चौरस मीटर जागेवर ८,८०० इतक्या संख्येने आणि विविध प्रकारची देशी जातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आवळा, हिरडा, बेहडा, शिवण, साग, कडूनिम, जांभूळ, अर्जुन इत्यादी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीने ६ जातीची १० ते १२ फूट उंचीची १,२०० झाडे संपूर्ण भूखंडाच्या संरक्षक भिंतीलगत लावण्यात येणार आहेत. त्यात करंज, बेहडा, बहावा, कदंब, सुरु, ताम्हण या झाडांचा समावेश असेल.
आपली भारतीय संस्कृती पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या वैदिक थीम पार्कची आवश्यकता आहे. मुंबई सगळ्यांना रोजगार देते, त्यामुळे आपण सगळ्यांनी असे उपक्रम राबवून मुंबईला जपायला हवे
-हेमा मालिनी, खासदार तथा अभिनेत्री
या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांचा जगण्याचा स्तर उंचावेल. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या उद्यानाचा नक्कीच फायदा होईल.
- अमृता फडणवीस, सामाजिक कार्यकर्त्या